दलाल मिशेल यास जामीन मंजूर, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याची सुनावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:36 IST2025-02-19T07:35:58+5:302025-02-19T07:36:36+5:30
वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात खटला सुरू असून तो इतक्यात तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही.

दलाल मिशेल यास जामीन मंजूर, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याची सुनावणी सुरू
नवी दिल्ली : सुमारे ३६०० काेटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणातील कथित दलाल ख्रिश्चियन मिशेल जेम्स याला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत असून जेम्स गेल्या सहा
वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात खटला सुरू असून तो इतक्यात तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही.
मूळ ब्रिटिश नागरिक असलेल्या ख्रिश्चियन मिशेलच्या वतीने ॲड. अल्जो के. जोसेफ आणि ॲड. विष्णू शंकर यांनी युक्तिवाद केला. दुबईतून २०१८मध्ये प्रत्यार्पण झाल्यापासून मिशेल तुरुंगात आहे, तर सीबीआयचा तपास अजूनही सुरू आहे. मिशेलने या मुद्द्याआधारे दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली जामिनासाठीची याचिका २५ सप्टेंबर २०२४ रोजी फेटाळली गेल्यावर त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
प्रकरण काय?
ऑगस्टा वेस्टलँडशी १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर पुरवठ्यासाठी २०१० मध्ये ५५.६२ कोटी युरो इतक्या रकमेचा करार करण्यात आला होता.
यात सरकारी तिजोरीला सुमारे ३९.८२ कोटी युरोचा (सुमारे २,६६६ कोटी रुपये) फटका बसला होता.
ईडीने या प्रकरणी जून २०१६मध्ये मिशेलविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
मिशेलने यात २२५ कोटी रुपये दलाली कमावल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टर खरेदीत एकूण तीन दलालांपैकी मिशेल एक आहे.
अन्य दोन दलालांत गुईडो हेश्के आणि कार्लो गेरोसा यांचा समावेश आहे.