दाऊदला घेरण्याची तयारी, दुबईनंतर आता ब्रिटनमधील संपत्ती होणार जप्त
By Admin | Updated: May 4, 2017 19:45 IST2017-05-04T19:45:46+5:302017-05-04T19:45:46+5:30
1993 मध्ये मुंबईत साखळी बाँबस्फोट घडवून शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर याला इंग्लंडमध्येही घेरण्याची तयारी सुरू

दाऊदला घेरण्याची तयारी, दुबईनंतर आता ब्रिटनमधील संपत्ती होणार जप्त
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 -1993 मध्ये मुंबईत साखळी बाँबस्फोट घडवून शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर याला इंग्लंडमध्येही घेरण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने ब्रिटन सरकारला दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे दुबईनंतर आता ब्रिटनमधीलही दाऊदची संपत्ती जप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गृह मंत्रालयाच्या एका अधिका-याने गुरूवारी याबाबत माहिती दिली. ब्रिटनमधील दाऊदच्या संपत्तीबाबत माहिती असून सरकारने वेळोवेळी ब्रिटनच्या गुप्तचर संस्थांसोबत याबाबत माहिती शेअर केली आहे. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.
भारत आणि ब्रिटनदरम्यान गुरूवारी गृहसचिव स्तरावरील चर्चेनंतर गृह मंत्रालयाचे सल्लागार अशोक प्रसाद यांनी दुस-या टप्प्यातील चर्चेत दाऊदच्या संपत्तीचा मुद्दा उचलल्याचं सांगितलं. सीबीआय आणि इतर संस्थांनी याआधीही हा मुद्दा उपस्थित केला होता.
दाऊदची इंग्लंडमध्ये 15 ठिकाणी संपत्ती आहे. यामध्ये आलिशान हॉटेल्स, दुकाने आणि निवासस्थानांचा समावेश आहे. संपत्ती खरेदीसाठी दाऊद हवालामार्फत भारत आणि खाडी देशांमधून पैसा पाठवीत असतो. हवालाच्या पैशातून ब्रिटनमध्ये एकूण 15 ठिकाणी ‘डी गॅंग’च्या सदस्यांच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे, तसेच बॅंकांमध्ये पैसा गुंतविला आहे. दाऊदच्या सर्व संपत्तीचे पुरावे भारताकडे आहेत.
या वर्षीच्या सुरूवातीलाच दाऊद इब्राहिमला संयुक्त अरब अमिराती(यूएई) च्या सरकारने जबर दणका दिला होता. यूएई सरकारने दाऊदची त्यांच्या देशातील 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.