लग्नाच्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू; आनंदाचे क्षण काही सेकंदात दु:खात बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:19 IST2025-05-18T15:19:13+5:302025-05-18T15:19:41+5:30
कोतवाली क्षेत्रातील किसवापूर गावात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या महेश बाथम यांची मुलगी रिंकी हिचं राहुल सोबत लग्न होणार होते

लग्नाच्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू; आनंदाचे क्षण काही सेकंदात दु:खात बदलले
उत्तर प्रदेशात कन्नौज येथे खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी संध्याकाळी एका युवतीचं लग्न होणार होते, घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. त्यातच अचानक वधूची तब्येत ढासळली, तिला तातडीने गावातील रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी उपचारावेळी औषध खाल्ल्यानंतर काहीच वेळात वधूचा मृत्यू झाला. या घटनेने लग्न घरात शोककळा पसरली. आनंदाच्या क्षणात दु:खाचे विरजन पडले. डॉक्टरांनी चुकीचे औषध दिल्याने मुलीचा मृत्यू झाला असा दावा तिच्या कुटुंबाने केला.
कोतवाली क्षेत्रातील किसवापूर गावात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या महेश बाथम यांची मुलगी रिंकी हिचं राहुल सोबत लग्न होणार होते. शनिवारी राहुल वऱ्हाड घेऊन किसवापूर गावात पोहचला. त्यात अचानक रिंकीची तब्येत बिघडली. घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले तिथे तिच्यावर उपचार सुरू झाले. काही वेळात उपचारादरम्यान रिंकीचा मृत्यू झाला. रिंकीच्या अचानक मृत्यूने घरच्यांना धक्का बसला. डॉक्टरांनी उपचारावेळी चुकीची औषधे दिली त्यात रिंकीचा जीव गेला असा आरोप कुटुंबियांनी केला.
रिंकीच्या घरी वऱ्हाडी मंडळीच्या स्वागताची तयारी चालू होती. लग्नासाठी घरच्या पै पाहुण्यांसह गावातील लोकांनी गर्दी केली होती. लग्नात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. ज्या घरात सनई चौघडे वाजत होते. तिथे रिंकीच्या मृत्यूने सर्व काही दु:खात बदलले. रिंकीच्या मृत्यूबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.