उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका नवरीने नवरदेवाच्या कुटुंबाने दागिने कमी आणले म्हणून लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात कमी दागिने पाहून वधू खूप नाराज झाली आणि अखेरच्या क्षणी तिने लग्नास नकार दिला. खूप प्रयत्न करूनही ती नंतर लग्नासाठी तयार झाली नाही. शेवटी वरापक्षाला वधूशिवायच रिकाम्या हाताने परतावं लागलं. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. रविवारी रात्री लग्नाची वरात आली होती. लग्नामुळे घरामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. मोठ्या संख्येने पाहुणे आले होते. नृत्य आणि गायनानंतर लग्नातील पाहुण्यांना नाश्ता देण्यात आला. नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. त्यानंतर स्पार्कल गनने आतिषबाजी केली. मात्र त्यानंतर लग्न मंडपात वर पक्षाने वधूसाठी दागिने आणि इतर वस्तू आणल्या नव्हत्या. त्यामुळे वधूने लग्नास नकार दिला.
18 फेब्रुवारी रोजी झालेल्या या लग्नातील वादाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. बनसडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनीही दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी (19 फेब्रुवारी) दोन्ही पक्षांची पोलीस ठाण्यात पंचायतही झाली.
पोलिसांचं म्हणणं आहे की, वर पक्षाने वधूसाठी दागिने आणि इतर वस्तू आणल्या नाहीत, यामुळे वधू पक्ष संतप्त झाला. त्यामुळे त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात आले आणि एकमेकांशी बोलले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.