बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील शिवसागर पोलीस स्टेशन हद्दीतील धनवा गावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. या गावात राहणाऱ्या एका मुलीचा विवाह तिच्या वडिलांनी ठरवला, पण त्या विवाहामुळे दुसरीच एक प्रेमकहाणी जोडली गेली. मुलीचे वडील आणि मुलाची आई एकमेकांच्या प्रेमात पडले आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली.
धनवा गावचे रहिवासी दयाशंकर राम आपल्या मुलीचं लग्न धर्मशीला देवी यांच्या मुलासोबत ठरवण्यासाठी गेले होते. मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडले, आणि दोन्ही कुटुंबांमध्ये लग्न निश्चितही झालं. यानंतर दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या संपर्कात राहू लागली, आणि हळूहळू दयाशंकर राम आणि धर्मशीला देवी यांच्या नात्याला प्रेमाचं वळण लागलं.
कोर्ट मॅरेजसाठी न्यायालयात पोहोचले!
दयाशंकर यांच्या दोन पत्नींचं निधन झाले असून, त्यांना तीन मुले आहेत. तर, धर्मशीला देवी या दिल्लीत राहतात आणि त्यांचं लग्न सुनील राम नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. धर्मशीला देवींचा आरोप आहे की, त्यांचा पती त्यांच्यावर नेहमीच अत्याचार करतो. त्यामुळे त्यांनी आपला संसार मोडण्याचा निर्णय घेतला आणि दयाशंकर यांच्यासोबत आयुष्य घालवण्याचं ठरवलं.
मंगळवारी दोघंही कोर्ट मॅरेजसाठी न्यायालयात पोहोचले. मात्र, ही बातमी धर्मशीला यांचा सुनील रामपर्यंत पोहोचली आणि ते आपल्या कुटुंबासह कोर्टात धडकले. तिथे दोघांना रंगेहाथ पकडलं गेलं आणि बघता बघता वातावरण तापलं. दोन्ही कुटुंबं आमनेसामने आली आणि मोठा वाद झाला.
चप्पल-बूटांनी मारहाणवाद इतका विकोपाला गेला की, धर्मशीला देवीच्या कुटुंबीयांनी दयाशंकर राम यांना चप्पल आणि बुटांनी बेदम मारहाण केली. पोलीस घटनास्थळी होते, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही बाजू संतप्त झाल्या होत्या. जवळपास तासभर चाललेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यादरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. अखेरीस दोन्ही कुटुंबीयांनी दयाशंकर आणि धर्मशीला यांना सोबत घेऊन घर गाठलं.