लग्नानंतर नवरीची पाठवणी; सासरी गेल्यानंतर १० तासांत मृत्यूची बातमी आली; कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:23 IST2022-04-21T13:21:49+5:302022-04-21T13:23:36+5:30
लग्नानंतर सासरी गेलेल्या नववधूचा १० तासांनंतर मृत्यू; दोन्ही कुटुंबांवर शोककळा

लग्नानंतर नवरीची पाठवणी; सासरी गेल्यानंतर १० तासांत मृत्यूची बातमी आली; कुटुंबावर शोककळा
जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. लग्नानंतर सासरी गेलेल्या नवविवाहितेची प्रकृती अचानक बिघडली. लग्नाच्या अवघ्या १० तासांत नववधूचा मृत्यू झाला.
जोधपूरातल्या जोधा गावात एक वरात आली होती. वधूच्या कुटुंबानं लेकीची सासरी पाठवणी केली. मात्र सासरी पोहोचल्यानंतर काही तासांमध्येच नववधूची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
बालेसरच्या तेना गावात वास्तव्यास असणारे सुभाष मेघवाल मंगळवारी रात्री वरात घेऊन जोधा गावातल्या छगनाराम यांच्या घरी आले होते. सुभाष यांनी छगनाराम यांची कन्या रेखासोबत सात फेरे घेतले. सकाळी रेखाच्या कुटुंबीयांनी तिची पाठवणी केली. सासरी नवदाम्पत्याचं जोरदार स्वागत झालं. दोघांनी देवी देवतांची पूजा केली.
संध्याकाळी रेखाची प्रकृती अचानक बिघडली. रेखा बेशुद्ध पडली. तिला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी रेखाला मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. उष्माघातामुळे रेखाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.