तृणमूल खासदारांच्या लाचखोरीचे स्टिंग
By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:51+5:302016-03-16T08:39:51+5:30
तृणमूलच्या काही खासदारांनी एका बनावट खासगी फर्मला लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याच्या ‘स्टिंग आॅपरेशन’चे मंगळवारी संसदेत पडसाद उमटले.

तृणमूल खासदारांच्या लाचखोरीचे स्टिंग
नवी दिल्ली : तृणमूलच्या काही खासदारांनी एका बनावट खासगी फर्मला लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याच्या ‘स्टिंग आॅपरेशन’चे मंगळवारी संसदेत पडसाद उमटले. या प्रकरणी तपासातूनच सत्य बाहेर येईल, असे सरकारने स्पष्ट केले असतानाच या पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राजकीय कट रचण्यात आल्याचा आरोप केला आहे.
शून्य तासाला माकपचे मोहम्मद सलीम यांनी हा मुद्दा उपस्थित करताच तृणमूल काँग्रेस आणि माकपमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यानंतर भाजपचे एस.एस. अहलुवालिया आणि काँग्रेसचे अधीररंजन चौधरी यांनी एकजूट दाखवत तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढविला. याप्रकरणी तपासाची मागणीही केली. त्यानंतर याप्रकरणी हस्तक्षेप करताना संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू म्हणाले की, संसदेची प्रतिष्ठा डावाला लागली असताना आम्हाला सत्य सिद्ध करावे लागेल. केवळ षड्यंत्र रचल्याचा आरोप करणे पुरेसे नाही, त्यामुळे जनतेचे समाधान होणार नाही. सरकारने चौकशी करावी अथवा लोकसभाध्यक्षांनी तसा आदेश द्यावा. काँग्रेस, माकप व भाकपच्या सदस्यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यावर हे प्रकरण तपासून पाहिले जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त झैदी यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)