"मुला-बाळाची, देवाची शपथ तोडा..., मी हनुमानजींना सांगेन..."; असं का म्हणतायत केजरीवाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:07 IST2025-01-25T13:06:46+5:302025-01-25T13:07:29+5:30
...अशा शपथा तोडल्याने काहीही होत नाही, असा विश्वास देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. ही शपथ संबंधित लोकांना लागू नये, अशी मागणी आपण हनुमानजींकडे करू, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

"मुला-बाळाची, देवाची शपथ तोडा..., मी हनुमानजींना सांगेन..."; असं का म्हणतायत केजरीवाल?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काही लोकांकडून जनतेला बूट, जॅकेट, ब्लँकेट आदी साहित्य आणि पैसे वाटले जात आहे आणि मतदान करण्यासाठी मुलाबाळांची आणि देवाची शपथ दिली जात आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याच वेळी त्यांनी, जनतेला या शपथा तोडून मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, अशा शपथा तोडल्याने काहीही होत नाही, असा विश्वास देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. ही शपथ संबंधित लोकांना लागू नये, अशी मागणी आपण हनुमानजींकडे करू, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
'आप' राष्ट्रीय संयोजक केजरीवाल शुक्रवारी एका व्हिडिओ मैसेज मध्ये म्हणाले, "मला असे समजले आहे की, आपण जेव्हा पैसे घेण्यासाठी गेला होतात, तेव्हा त्यांनी आपल्याला शपथ दिली. कुणाला मुलाची शरपथ दिली, तर कुणाला देवाची शपथ दिली. वेगवेगळ्या शपथा दिल्या. त्या शपथेची चिंता करू नका. त्या शपथांना काही अर्थ नाही. शपथेला तेव्ह अर्थ प्राप्त होतो, जेव्हा एखाद्या पवित्र आणि प्रामाणिक कामासाठी आपण ती घेतो. जर आपण एखाद्या बेईमान व्यक्तीकडून पैसे घेत असाल आणि तो आपल्याला शपथ देत असले अथवा खायला सांगत असेल, तर ती शपथ लागत नाही. ती खोटी शपथ आहे."
जो आपका वोट पैसे या तोहफ़ों से खरीदना चाहे, उसे कभी वोट न दें। आपका वोट आपकी आवाज़ है, इसे पैसे या लालच में न बेचें। https://t.co/KySrP2h4c9
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 24, 2025
मी हनुमानजींना सांगेन की -
दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शपथ तोडण्याचा एक मार्गही सांगितला, ते म्हणाले, "आपण आपल्या देवाच्या मूर्तीसमोर उभे राहा आणि हात जोडून सांगा की, देवा, मला जबरदस्तीने शपथ घ्यावी लागली. ती शपथ खोटी आहे. मी देशासाठी मतदान करेन. मी त्या देशद्रोह्यांना मतदान करणार नाही. आपण असे देवाला सांगितले की आपली शपथ तुटून जाईल. मीही हनुमानजींच्या मंदिरात जात असतो. पुढच्या मंगळवारी मंदिरात जाईन, तेव्हा मी हनुमानजींना सांगेन की, माझ्या लोकांकडून जबरदस्तीने जी शपथ घेतली गेली आहे, ती त्यांना लागू देऊ नकोस. देव माझे ऐकतो". एवढेच नाही तर, लोकांनी त्यांच्या इच्छेनुसार मतदान करावे, कुणी कोणाला मतदान केले हे कुणालाही समजत नाही, असेही केजरीवाल म्हणाले.