विरोधकांच्या एकतेवर ममता बॅनर्जींचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 14:18 IST2020-01-09T14:17:52+5:302020-01-09T14:18:49+5:30
हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला.

विरोधकांच्या एकतेवर ममता बॅनर्जींचा बहिष्कार
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये सीएए आणि एनआरसीवरून काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या दोन्ही कायद्यांविरुद्ध एकट्याने लढा देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच 13 जानेवारी रोजी दिल्लीत विरोधकांकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेत बोलताना ममता म्हणाल्या की, राज्यात काँग्रेस आणि सीपीएमकडून घाणेरडं राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकता कायदा याविरुद्ध एकटीने लढा देण्याचे ठरवले आहे. बुधवारी भारत बंदवरून देखील ममता यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले होते.
ममता म्हणाल्या की, भारतबंदचा आपण विरोध करत आहोत. डावे पक्ष आता फक्त शोभेसाठी असल्याची टीका त्यांनी केली. बंगालमध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसा होत असून याचा आपण विरोध करत असल्याचे ममता यांनी स्पष्ट केले.
दरम्यान हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला.