भोपाळ : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अनेक एजन्सींनी केलेले १६ तासांचे अथक प्रयत्न अखेर अपयशी ठरले. १४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या एका १० वर्षांच्या मुलाचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी यासंदर्भात रविवारी माहिती देताना सांगितले की, अनेक एजन्सींच्या मदतीने १६ तासांच्या अथक परिश्रमानंतर रविवारी मुलाला बाहेर काढण्यात आले. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. गुना जिल्ह्यात असलेल्या पिपलिया गावात शनिवारी संध्याकाळी ५ वाजता सुमित मीना नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. बोअरवेल १४० फूट खोल होती. मात्र मुलगा ३९ फुटांवर अडकला होता.
तेथे तो रात्रभर थंड वातावरणात राहिल्याने हायपोथर्मियामुळे (शरीराचे तापमान ९५ अंश फॅरेनहाइटच्या खाली गेल्यावर उद्भवणारी स्थिती) त्याचा मृत्यू झाला. त्याच्या तोंडात चिखल गेला होता. त्याला बाहेर काढल्यावर लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.