नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दिल्लीत असून याठिकाणी इंडिया आघाडीच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. मात्र मनसेसोबत सुरू असलेल्या युतीच्या चर्चेवरून इंडिया आघाडीत काय चर्चा होणार का या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही दोघे आमचा निर्णय घेण्यास सक्षम आहोत, आम्हाला तिसऱ्याची गरज नाही असं स्पष्ट विधान केले आहे. सोबतच भाषिक वादावरील प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज ठाकरेंबाबत युतीवर दुसऱ्या कुणासोबत चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमची भूमिका घ्यायला सक्षम आहोत. आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही बंधू खंबीर आहोत. इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटीशर्ती ठरल्या नाहीत. आम्हाला काय करायचे त्यावर तिसऱ्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट केले.
तसेच हिंदी भाषिक वाद भाजपाकडून केला जात आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणत्या भाषेचा द्वेष करत नाही, परंतु आमच्यावर सक्ती करू नका. आज मी हिंदीत उत्तर देतोय, आम्हाला कुणी पहिलीपासून शिकवली नाही. नरेंद्र मोदी-अमित शाह हिंदीत बोलतात, ते लहानपणापासून शिकले नाहीत. आज हिंदी भाषिक राज्यात तिसरी भाषा कोणती शिकवणार, तिथे मराठी, तेलगु, कन्नड शिकवणार का? असा प्रश्न उपस्थित करत जेव्हा भाषेची गरज असेल तेव्हा शिकली जाईल, आमच्यावर जबरदस्ती करू नका असं सांगत उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सुत्रावरून भाजपाला टोला लगावला.
निवडणूक घेण्याचा फार्स कशाला?
दरम्यान, प्रत्येक राज्याच्या निवडणुका त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार होणार आहेत. बिहारमध्ये जो मतदार याद्यांचा घोळ झाला आहे. स्वत:ची ओळख मतदारांनी पटवून द्यायची, त्याचा अर्थ देशात अघोषित NRC लागू झालंय का हा प्रश्न आहे. याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला हवे आहे. EVM मशिनवर आक्षेप असताना त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT काढून टाकले आहे. मग मतदान घेता कशाला, तुम्ही किती जागा जिंकल्या हे जाहीर करून टाका. बॅलेट पेपरवर शिक्का मारल्यानंतर मत कुठे दिले हे कळत होते. आता व्हीव्हीपॅटही नाही मग निवडणूक घेण्याचा फार्स करता कशाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.