संविधानावरील चर्चेत दोन्ही बाजूंनी ‘फायर’; वारंवार संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न : राजनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:29 IST2024-12-14T06:29:14+5:302024-12-14T06:29:24+5:30
विरोधी पक्षाचे अनेक नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरतात, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या खिशात ठेवलेले संविधान पाहिले असल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले.

संविधानावरील चर्चेत दोन्ही बाजूंनी ‘फायर’; वारंवार संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न : राजनाथ
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाचे संविधान निर्माण करण्यात अनेक पक्षांचे योगदान आहे. ते कुठल्या एका पक्षाने तयार केले नाही. मात्र, एक पक्ष सातत्याने संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
विरोधी पक्षाचे अनेक नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरतात, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या खिशात ठेवलेले संविधान पाहिले असल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार संविधानाची मूल्ये केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे. काँग्रेसने केवळ संविधानात संशोधनच केले नाही, तर ते बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राजनाथ यांनी केला.
संविधान हृदयात हवे
संविधान नेत्यांच्या हातात नाही तर हृदयात हवे असे नमूद करत लोजप खासदार शांभवी चौधरी यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.
राज्यघटना कोणत्या एका पक्षाची देणगी नाही. भारताचे संविधान देशातील नागरिक, भारताचे विचार आणि मूल्यांवर आधारीत दस्तऐवज आहे. - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
काँग्रेसने कलम ३५६ चा
गैरवापर केला : जेडीएस
देशात काँग्रेसचे सरकार असताना त्यांच्या पंतप्रधानांनी कलम ३५६ चा गैरवापर करत अनेक राज्यांमधील सरकारे पाडल्याचा आरोप पंचायत राजमंत्री व जेडीएस नेते राजीव रंजन सिंह यांनी केला.
दहा वर्षांत धर्मनिरपेक्षतेची उपेक्षा : तृणमूल
दहा वर्षांत देशातील धर्मनिरपेक्षतेची उपेक्षा करत ती मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून राज्यघटनेच्या प्रस्तावनेत तसा उल्लेख असल्याचे नमूद करत बॅनर्जींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.