न्यूयॉर्क/वॉशिंग्टन - अमेरिकेला भारत व पाकिस्तानशी संबंध टिकवून ठेवावे लागतील. भारताशी मैत्रीचे संबंध असतील तर पाकिस्तानशी शत्रुत्व पत्करावे लागेल असे होत नाही. या दोन्ही देशांशी असलेली जवळीक हा बायनरी स्वीचप्रमाणे नाही, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे जनरल मायकल कुरिल्ला यांनी सांगितले.
अमेरिकेसह इतर देशांत दहशतवादी कारवायांचा कट रचणाऱ्या संघटनांमध्ये आयएसआयएस-खुरासानचा (आयएसआयएस-के) समावेश आहे. तालिबानने आयएसआयएस-केच्या अनेक सदस्यांना अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात नेले आहे. पाकिस्तानने दिलेल्या सहकार्यामुळे अमेरिकेने आयएसआयएस-के विरोधात केलेल्या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
कुरिल्ला यांनी सांगितले की, आयएसआयएस-केचा दहशतवादी मोहम्मद शरीफुल्ला उर्फ जफर याला २६ ऑगस्ट २०२१ रोजी काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एबी गेटजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या हल्ल्यात अमेरिकेचे १३ सैनिक आणि सुमारे १६० नागरिक ठार झाले.