गोरखपूर: चीनबरोबर असलेल्या सीमातंटा अद्यापही मिटलेला नसून, ते भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यानंतरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे पाकिस्तानने भारताविरोधात सुरू ठेवलेले छुपे युद्ध व सातत्याने तो देश काढत असलेल्या कुरापती हे आहे, असे परखड मत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी नोंदवले.
गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराला शुक्रवारी भेट देऊन चौहान यांनी तिथे देवदर्शन घेतले. त्यांनी सांगितले की, शेजारी देशातील अस्थिरतेचा परिणाम भारतावरही होत आहे. उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भावी काळात जी युद्धे लढली जातील, त्यांकरिता सज्ज राहण्याचेही आव्हान भारतापुढे आहे. भविष्यात युद्धे जमीन, हवा व पाणी यांच्याबरोबरच अंतराळ, सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक डोमेन लढली जाणार आहेत. यासाठी भारताला सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी लागणार आहे. शत्रूंकडे (चीन आणि पाकिस्तान) अण्वस्त्रे आहेत. त्यांच्याशी पारंपरिक किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे लढताना भारताला विविध व्यूहरचना कराव्या लागतील.
‘ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य’सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करावे, त्यासाठी कशा प्रकारे लढावे याबाबतचे सर्व निर्णय सैन्यदलांनीच घेतले. पहलगाम हल्ल्याचा सूड घेणे इतकेच ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट नव्हते; तर सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पायबंदासाठी कठोर कारवाई केली. आक्रमक पवित्र्याने पाकिस्तान गर्भगळीत झाला व त्याने शस्त्रसंधी करण्याची विनंती केली.
अफवांचाही मुकाबलासीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना खोट्या बातम्या दिल्या. अफवा पसरविण्याच्याही प्रयत्न झाला; पण या सगळ्या गोष्टींवर मात केली गेली.