बॉम्बच्या अफवेने विमान मध्येच उतरवले
By Admin | Updated: July 2, 2014 03:35 IST2014-07-02T03:35:09+5:302014-07-02T03:35:09+5:30
कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्याने या विमानाला येथे आणीबाणीच्या परिस्थितीत उतरविले गेले

बॉम्बच्या अफवेने विमान मध्येच उतरवले
बंगळुरू : कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्याने या विमानाला येथे आणीबाणीच्या परिस्थितीत उतरविले गेले. मात्र, तपासणीअंती त्यात कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. या विमानात १६४ प्रवासी होते.
बंगळुरूचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार एअर बस ३२० ची तपासणी करण्यात आली. मात्र, कोणताही स्फोटक पदार्थ अथवा बॉम्ब आढळला नाही. सोमवारी रात्री ८ वाजता कोच्चीहून उड्डाण केल्यानंतर हे विमान येथे संकटकालीन परिस्थितीत उतरविण्यात आले होते. त्यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली. रात्री १० वाजता सुरू झालेली तपासणी मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होती. सर्व प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. मात्र, काहीही सापडले नाही. त्यानंतर या प्रवाशांना सकाळी अन्य एका विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले. हा फोन कोच्चीमधील एका इसमाने केला असून तो विमानतळावर आपल्या मैत्रिणीला सोडण्यासाठी आला होता. मैत्रिणीने त्याला दूरध्वनीवरून विमानतळावर कडक तपासणी केली जात असल्याचे सांगून फोन बंद केला होता. त्यामुळे घाबरून त्याने विमानतळावर दूरध्वनी करून विमानात बॉम्ब ठेवला असण्याची शक्यता असल्याचे कळविले होते. (वृत्तसंस्था)