दिवाळीपूर्वीच एटीएममधून लक्ष्मी बसरली; 100 ऐवजी 500 च्या नोटा येऊ लागल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:16 IST2022-10-27T13:05:39+5:302022-10-27T13:16:19+5:30
एका ग्राहकाने या प्रकाराची माहिती गार्डला दिल्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. यानंतर बँकेचे अधिकारी तिथे दाखल झाले.

दिवाळीपूर्वीच एटीएममधून लक्ष्मी बसरली; 100 ऐवजी 500 च्या नोटा येऊ लागल्या अन्...
अलीगढमध्ये दिवाळीपूर्वीच एटीएममधून लक्ष्मी बरसल्याचा प्रकार घडला आहे. खैरच्या अग्रसेन मार्केटमधील एटीएम सेंटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या एटीएममधून १०० ऐवजी ५०० रुपयांच्या नोटा येऊ लागल्या होत्या. यामुळे बँकेचे अधिकारी टेन्शनमध्ये आले आहेत.
एकूण १८ ट्रान्झेक्शनमध्ये एक लाख ९६ हजार रुपये जादा निघाल्याने खळबळ उडाली आहे. एका ग्राहकाने या प्रकाराची माहिती गार्डला दिल्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. यानंतर बँकेचे अधिकारी तिथे दाखल झाले. ही १८ ट्रान्झेक्शन करणाऱ्या ग्राहकांना सीसीटीव्ही कॅमेरातून ओळख पटविणे आणि त्यांच्याशी संपर्क साधून वसुली करण्याचे कार सुरु झाले आहे.
बँक ऑफ इंडियाच्या या एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. बँकेचे शाखा मॅनेजर विकास शर्मा यांच्या आदेशाने या एटीएममध्ये २१ ऑक्टोबरला १० लाख रुपये टाकण्यात आले होते. या सर्व नोटा ५००च्या होत्या. एकूण २००० नोटा होत्या. २२ ऑक्टोबरच्या रात्री एटीएममधून १८ ट्रान्झेक्शन झाली. त्यातून १०० ऐवजी ५०० च्या नोटा आल्या. २३ ऑक्टोबरला मुमताज अली एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आल्या आणि त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली.
धक्कादायक बाब म्हणजे १०० ऐवजी ५०० च्या नोटा येत असल्याचे लक्षात आल्यावर दोन ग्राहकांनी पुन्हा पुन्हा पैसे काढले. एका ग्राहकाने तर सलग ८ ट्रान्झेक्शन केले आणि ६० हजार रुपये जादाचे काढले. काही ग्राहक हे दुसऱ्या बँकांचे होते. त्या बँकांनाही याबाबत कळविण्यात आले आहे.