'नीट'ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला; कोटा शहरातील हॉस्टेलमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:41 IST2025-10-26T09:41:52+5:302025-10-26T09:41:52+5:30
रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी रोशन मृत असल्याचे घोषित केले.

'नीट'ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला; कोटा शहरातील हॉस्टेलमधील घटना
कोटा : नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या रोशनकुमार पात्रो या विद्यार्थ्याचा मृतदेह राजस्थानातील कोटा येथे राजीव गांधीनगर येथील हॉस्टेलमध्ये शनिवारी आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. रोशन हा ओडिशातील गंजाम जिल्ह्यातल्या अभयपूर येथील मूळ रहिवासी आहे.
नीट परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी त्याने कोटा येथील एका कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला होता व हॉस्टेलमध्ये राहात होता. तेथील खोलीमधील पलंगावर शनिवारी दुपारी रोशन निपचित अवस्थेत आढळून आला. त्याने उलटीही केली होती. त्याला रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी रोशन मृत असल्याचे घोषित केले.
फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकाने त्याच्या खोलीची तपासणी केली व आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
रोशन शिक्षणासाठी कोटा येथे आला पण...
यंदाच्या वर्षी रोशन कोटा येथे आला होता व हॉस्टेलमध्ये चौथ्या मजल्यावरील एका खोलीत राहत होता. त्याचा चुलतभाऊ वसतिगृहात पाचव्या मजल्यावरील खोलीमध्ये राहतो.
रोशन दुपारी जेवणासाठी न आल्याने चुलत भावाने त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. फोन केला. पण काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने हॉस्टेल वार्डनला ही माहिती दिली.
वॉर्डनने स्पेअर किल्लीद्वारे दरवाजा उघडला तेव्हा खोलीत रोशन पलंगावर निपचित अवस्थेत आढळला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.