पणजी: ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त गोव्याला पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले पाहायला मिळत आहेत. अशातच, गोव्यातील कळंगुट बीचवर पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, सुदैवाने 20 जणांना वाचवण्यात बचावपथकाला यश आले आहे. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली.
या घटनेबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या बोटीचा अपघात झाला, त्यातील एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर इतर 20 जणांना वाचवण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पर्यटकांमध्ये सहा वर्षांच्या लहान मुलासह महिलांचा समावेश आहे. यातील दोन पर्यटक सोडून इतर सर्वांनी लाईफ जॅकेट घातले होते.
अपघात कुठे झाला?सरकारने नियुक्त केलेल्या लाइफसेव्हिंग एजन्सी दृष्टी मरीनच्या प्रवक्त्याने सांगितले की, बोट किनाऱ्यापासून सुमारे 60 मीटरवर उलटली. प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील खेड येथील 13 जणांच्या कुटुंबाचाही समावेश होता. अपघातातील जखमींनावर प्राथमिक उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. जखमींमध्ये सहा आणि सात वर्षांची दोन मुले आणि 25 आणि 55 वर्षांच्या दोन महिलांचा समावेश आहे.
मुंबईत बोटीचा अपघात झालाआठवडाभरापूर्वी मुंबईत एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. 100 हून अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटला नौदलाची बोट धडकली, ज्यामुळे हा अपघात झाला. त्या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.