हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील जमाल गावाजवळ एक संतापजनक घटना घडली आहे. गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला नाल्यात फेकून देण्यात आलं होतं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गायीच्या डोळ्यांवर पट्टी असल्यामुळे रात्री कोणीतरी मुद्दाम तिला नाल्यात फेकून दिल्याचं समोर आलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोहर रोडवरून जाणाऱ्या प्रेम कुमार, अजय ज्याणी आणि ओम प्रकाश यांनी सर्वात आधी गायीला नाल्यात पाहिलं. त्यांनी गायीला थोडं जवळ जाऊन नीट पाहिल्यावर तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसली. यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला. जवळचे लोक मदतीसाठी जमले. बराच प्रयत्न केल्यानंतर स्थानिकांनी गायीला नाल्यातून बाहेर काढलं.
डोळ्यांवर पट्टी काढताच गाय घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. या घटनेने सर्वांच्याच काळजात चर्र झालं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी गायीला महर्षी दयानंद सरस्वती गौशाळा समितीकडे सोपवलं आहे. समिती सदस्य विजय कुमार, जगतपाल आणि इतर लोकांनी या गायीची आता योग्य काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं.
समिती सदस्यांनी ही घटना केवळ अमानवीय नाही तर आपल्या समाजाच्या असंवेदनशीलतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते असं म्हटलं आहे. गावातील सरपंच प्रतिनिधी ओमप्रकाश डूडी यांनीही या कृत्याचा तीव्र निषेध केला. तसेच निष्पाप प्राण्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून मारण्याच्या उद्देशाने नाल्यात फेकणं हे अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.