काळा पैसा लवकर बाहेर येणार - जेटली
By Admin | Updated: July 25, 2014 19:09 IST2014-07-25T16:37:28+5:302014-07-25T19:09:01+5:30
काळा पैसा पुन्हा भारतात आणण्यासाठी आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिले आहे.
काळा पैसा लवकर बाहेर येणार - जेटली
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५- काळा पैसा पुन्हा भारतात आणण्यासाठी आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिले आहे. काळा पैशांसदर्भात उपलब्ध होणारी सर्व माहिती आम्ही सुप्रीम कोर्टात देत आहोत अशी माहितीही जेटली यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन द्यायचे. आता मोदी सत्तेवर आल्याने काळा पैसा परत येईल अशी आशा आहे. गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काळा पैशावरुन केंद्र सरकारलाच टोला लगावला होता. काळा पैसा आणणे अशक्य असल्याचे दुबेंनी म्हटले होते. सत्ताधारी पक्षातील खासदारानेच हा टोला लगावल्याने भाजपची लोकसभेत कोंडी झाली होती .
यापार्श्वभूमीवर शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत निवेदन केले. यात जेटली म्हणाले, आम्ही काळा पैसा परत आणण्यासाठी कटीबद्ध असून त्यासाठी देशाला आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही. खासदार दुबे म्हणतात ते ह्यात असताना तरी काळा पैसा परत येणार नाही. मी त्यांना सांगीन, देव तुम्हाला दिर्घायूष्य देवो आणि आम्ही काळा पैसाही परत आणू असा चिमटाही त्यांनी काढला. काळा पैशाला आधार देणा-या देशावर जागतिक पातळीवर दबाव वाढत आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून काळा पैशाविषयी माहिती दिली जात आहे असे जेटलींनी सांगितले.