महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी गुजरातमध्ये भाजपा निश्चिंत का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 07:23 IST2017-11-25T04:47:46+5:302017-11-25T07:23:13+5:30
सूरत : नोटाबंदी, जीएसटीमुळे लोक व व्यापारी नाराज असले आणि महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असल्याने भाजपाचे नेते निश्चिंत आहेत.

महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी गुजरातमध्ये भाजपा निश्चिंत का ?
महेश खरे
सूरत : नोटाबंदी, जीएसटीमुळे लोक व व्यापारी नाराज असले आणि महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असल्याने भाजपाचे नेते निश्चिंत आहेत. शिवाय निष्ठावान, समर्पित व झुंजार कार्यकर्त्यांची फौज ही भाजपासाठी जमेची बाजू आहे.
पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, राज्यात एकूण मतदार आहेत ४ कोटी ३५ लाख. यात भाजपा कार्यकर्ते आहेत १ कोटी १५ लाख. जर एका कुटुंबात फक्त २ मतदार मानले तरी ही संख्या २.३० कोटी होते. जर, ७० टक्के मतदान गृहीत धरले तर भाजपाकडे आपल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील मते २ कोटींच्या आसपास होतात. भाजपाचे बूथ मॅनेजमेंट अभेद्य आणि अजेय मानले जाते. याचा अनुभव २०१२च्या विधानसभा निवडणुका आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांत आला आहे. आरएसएस व विहिंपचाही सक्रिय सहभाग मिळतो.
>१३ उमेदवार जाहीर
भाजपाने शुक्रवारी १३ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यात दोन विद्यमान आमदारांना तिकीट कापण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात आलेले प्रल्हाद पटेल यांनाही मेहसाणाच्या विजापूरमधून तिकीट नाकारले आहे. तेथून रमनभाई पटेल मैदानात असतील. भाजपाने आतापर्यंत १८२पैकी १४८ उमेदवार जाहीर केले आाहेत.
>मोदींच्या तीन सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २७ ते २९ नोव्हेंबर या काळात गुजरातचा दौरा करणार आहेत. पुन्हा ते डिसेंबरातही दौरा करणार आहेत. त्यांच्या ३0हून अधिक सभा राज्यात होणार आहेत.