केजरीवाल आणि आपच्या एवढ्या दारुण पराभवामागे काँग्रेस असल्याचे म्हटले जात आहे. केजरीवाल, सिसोदिया, सत्येंद्र जैन तर हरले आहेतच परंतू केजरीवालांनी ज्या विद्यमान आमदारांचे तिकीट कापले त्यांच्या जागी दिलेल्या २८ उमेदवारांचे काय झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
केजरीवालांनीच केजरीवालांना हरविले! आपच्या पराभवाची ही कारणे, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे...
केजरीवाल यांच्या पक्षाच्या पराभवाला अनेक कारणे आहेत. यापैकीच एक कारण म्हणजे त्या २८ पैकी बहुतांश जागांवर दगाफटका झाला आहे. पक्षाच्याच लोकांनी बंडाचे निशान रोवले असावे असे सांगितले जात आहे.
आपने ७० जागांपैकी २८ जागांवर नवीन चेहरे दिले होते. या जागांवरील विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले होते. यापैकी ७ उमेदवारच जिंकू शकले आहेत. उर्वरित २१ उमेदवार हे मोठ्या मतफरकाने हरले आहेत. या जागांवरील पराभवाला तिकीट कापल्या गेलेल्या आमदारांचे मोठे योगदान असल्याचे राजकीय विश्लेषकांमध्ये बोलले जात आहे.
आपच्या ज्या आमदारांची तिकिटे केजरीवालांनी कापली होती, ते एकतर भाजपात सहभागी झाले होते किंवा काँग्रेसकडून आणि अपक्ष म्हणून देखील उभे ठाकले होते. या तिकीट कापण्याचा फटका आपला बसला असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप २७ वर्षांनी राजधानीत सरकार स्थापन करणार आहे. भाजप ४७ जागांवर आघाडीवर आहे आणि आम आदमी पक्ष २३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे खातेही उघडलेले नाही. अशा परिस्थितीत आपला आता पाच वर्षे सरकार नसताना पक्ष टिकविण्याची कसरत करावी लागणार आहे. कोणतेही कार्यकर्त्यांचे बळ नसताना केवळ आंदोलनाच्या जिवावर उदयास आलेल्या पक्षाला आता अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी झगडावे लागणार असल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.