BJP Vinod Tawade News: नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी ९ एप्रिल रोजी दाखल आरोपपत्रातील महत्त्वाच्या मुद्यांची पडताळणी करून सुनावणी २५ एप्रिल रोजी निश्चित केली. आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचीही नावे आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. सुनावणीत ईडी व तपास अधिकाऱ्यांचे विशेष वकील न्यायालयाच्या अवलोकनार्थ केस डायरी सादर करतील. यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला भाजपाकडूनही उत्तर दिले जात आहे.
भाजपा सरकारच्या विरोधात निर्भीडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. यानंतर आता भाजपा नेते विनोद तावडे यांनी एक्सवर एक पोस्ट करत काँग्रेसवर पलटवार केला आहे.
गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही
गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही. नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात त्यांची कायदेशीर चौकशी सुरू आहे; म्हणून काँग्रेसने या बालिश निषेधांमध्ये सहभागी होऊन स्वतःलाच फसवू नये. संपूर्ण देशाला माहिती आहे की, या संदर्भातील प्रकरणाचा तपास १ नोव्हेंबर २०१२ रोजी सुरू झाला होता. त्यावेळेस काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार सत्तेत होते. अशा परिस्थितीत, काँग्रेस तपासाचा दोष भाजपावर टाकून जनतेची दिशाभूल करू शकत नाही, अशी टीका विनोद तावडे यांनी केली.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडलेले असतानाच जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू आहे. हरयाणामधील शिकोपूर जमीन व्यवहार प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीसाठी पत्नी प्रियंका गांधी यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रा यांनी सूचक विधान केले. आज आम्ही भोगत आहोत. वेळ बदलेल आणि वेळ बदलेल तेव्हा कदाचित त्यांनाही भोगावे लागेल, असे रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे.