- वसंत भोसलेदेशाच्या अनेक राज्यांत मोदी लाट आली असताना दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांतील १३२ मतदारसंघांमध्ये भाजपला केवळ तीस जागा मिळाल्या आहेत; शिवाय मित्रपक्षांचाही दारुण पराभव झाला आहे. कर्नाटक या एकमेव राज्यानेच मोदी लाटेत उडी घेतली आहे. याउलट प्रादेशिक पक्षांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांत अनेक वर्षांपासून प्रादेशिक पक्षांचा दबदबा आहे. तमिळनाडूत तर ५२ वर्षांपूर्वी राष्ट्रीय पक्षाचा पराभव झाला आहे तेव्हापासून द्रविड मुनेन कळघम किंवा अण्णा द्रमुक या पक्षांची सत्ता येते. लोकसभेच्या निवडणुकीत याच पक्षांना यश मिळते. या पक्षांबरोबर राष्ट्रीय पक्षांना जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. दक्षिण भारतातील पाच राज्यांत आणि तीन केंद्रशासित प्रदेशांत १३२ लोकसभेचे मतदारसंघ आहेत. सन २०१४ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांना यापैकी ९० जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना अनुक्रमे २२ आणि २० जागा मिळाल्या होत्या.तमिळनाडूमध्ये सत्तारूढ अण्णा द्रमुक-भाजप या युतीला केवळ एकच जागा मिळाली. द्रमुक पक्षाने काँग्रेस, मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच पीएमके, आदी पक्षांबरोबर महागठबंधन केले होते. या महागठबंधनने ३८ पैकी ३७ जागा जिंकल्या. त्यामध्ये द्रमुकला २२, काँग्रेस आठ, तर डाव्या पक्षांना चार जागा मिळाल्या आहेत.कर्नाटकात भाजपने मुसंडी मारत आपलाच पक्ष प्रथम क्रमांकावर आहे, हे सिद्ध केले आहे. राज्यात गतवर्षी सत्तेवर आलेल्या काँग्रेस जनता दल आघाडीचा सपशेल पराभव झाला आहे. भाजपने २५ जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि जनता दलास प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, आदींचा पराभव झाला आहे. भाजपने ही निवडणूक एकतर्फीच जिंकली आहे. एका जागेवर (मंड्या) अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. त्यालाही भाजपचा पाठिंबा होता.
दक्षिण भारतात भाजपला मर्यादाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:32 IST