पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा - बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 01:48 IST2021-05-08T01:47:43+5:302021-05-08T01:48:06+5:30
राज्यात पथक पाठविल्याबद्दल केली टीका

पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा - बॅनर्जी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात पथक पाठविण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले व त्यात तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या. त्यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस समोरासमोर उभे ठाकले आहेत.
“मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रेही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय पथक आलेही आहे. राज्यात जनतेने भाजपला स्वीकारले नाही म्हणून असे घडत आहे, ” असे बॅनर्जी म्हणाल्या. “जनादेशाचा स्वीकार करण्याचे मी भाजपला आवाहन करते. आपल्याला कोरोना संकटाला तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे,” असेही त्या म्हणाल्या. त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना धोरणावरच प्रश्न उपस्थित केला.
“केंद्राकडे कोरोनासंदर्भात कोणत्याही प्रकारचे पारदर्शक धोरण नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे,” असे बॅनर्जी म्हणाल्या.
भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करून, अजूनही राज्याला पुरेशा लसी मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले.