Delhi CM oath ceremony : नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान, दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे. कारण नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजप आज दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चत करणार आहे. दरम्यान, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा २० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता रामलीला मैदानावर होणार आहे. हा शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यात ३० हजारांहून अधिक लोक सहभागी होतील आणि विशेषतः दिल्लीतील लोक या सोहळ्याचे साक्षीदार असतील.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनाही आमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. याशिवाय, एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
याचबरोबर, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजकारणी आणि चित्रपट कलाकारांव्यतिरिक्त, खास लोकांना आमंत्रण पत्रिका पाठवल्या जात आहेत. ज्यामध्ये झोपडपट्टी अध्यक्ष, महिला/पुरुष ऑटो चालक, कॅब चालक आणि दिल्लीतील शेतकरी नेत्यांची नावे आहेत. दरम्यान, २७ वर्षांनंतर सत्तेत परतलेला भाजप शपथविधी सोहळ्याद्वारे दिल्लीतील जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की, भाजप नेहमीच त्यांच्यासोबत आहे आणि राहील.
नितीश कुमार सहभागी होणार नाहीतबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सध्या संपूर्ण राज्यात यात्रा सुरु आहे. त्यामुळे नितीश कुमार सहभागी होणार नाहीत. जेडीयू पक्षाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि मुंगेरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजवाड उर्फ लल्लन सिंह हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. यासोबतच, बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेतदिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.