मिलिंद कुलकर्णीपूर्वोत्तर राज्यात भाजपच्या प्रवेशाचे दार ठरलेल्या आसाममधील यंदाची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सलग १५ वर्षे काँग्रेसच्या ताब्यात हे राज्य ठेवणारे तरुण गोगोई यांच्या निधनामुळे नेतृत्वहीन असलेल्या काँग्रेसने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या रणनीतीनुसार यशस्वी आघाडी तयार केली. जुन्या चुका दुरुस्त करीत पावले उचलली. अनुकूल वातावरण असताना स्थानिक सक्षम नेता नसल्याची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागली. मात्र गेल्या वेळी मिळालेल्या १९ जागांवरून घेतलेली झेप हे निश्चितच काँग्रेसच्या सामूहिक नेतृत्वाची परिणती आहे.
याउलट भाजपने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करीत निवडणूक लढवली आणि जिंकली. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व ज्येष्ठ मंत्री हेमंत विश्व शर्मा असे दोन प्रमुख चेहरे भाजपकडे असल्याने त्यांनी दोघांचा खुबीने वापर केला. विकास पुरुष, मवाळ नेतृत्व अशी सोनोवाल यांची छवी असल्याने सर्वसामान्य मतदारांना त्यांनी आपलेसे केले. शर्मा हे लोकप्रिय आणि वादग्रस्त विधाने करण्यात पटाईत असे नेते म्हणून परिचित आहेत. मोगल राज, बाबर राज नको, अशी त्यांची विधाने वादग्रस्त ठरली. बांगलादेशातील स्थलांतरित मुस्लिमांविषयी जाणीवपूर्वक केलेल्या विधानाने त्यांनी बंगाली हिंदू मतांचे ध्रुवीकरण साधले.
पश्चिम बंगालमध्ये सीएए व एनआरसी याविषयी उच्चरवाने बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी आसाममध्ये याविषयी चकार शब्द काढला नाही. आसाममधील प्रादेशिक रचना व तेथील सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक प्रश्नांचे स्वरूप पाहता हा कौल संमिश्र स्वरूपाचा आहे. बराक व्हॅली, अप्पर आसाम, लोअर आसाम व बोडोलँड या चार विभागांमध्ये दोन्ही पक्षांनी अपेक्षेप्रमाणे यश मिळविले आहे.
आसामात भाजपची खेळी यशस्वी
बआसामची सत्ता हातात येत असली तरी मुख्यमंत्री कोण असेल, याविषयी उत्कंठा कायम आहे. सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता राखली असल्याने त्यांचा दावा प्रबळ आहे. परंतु हेमंत विश्व शर्मा यांची सरकारमधील मंत्री म्हणून कामगिरी आणि विशेषतः कोरोना काळात हाताळलेली परिस्थिती ही त्यांची जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेतून त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. पाच वर्षे त्यांनी प्रतीक्षा केली. आता मात्र संधी न मिळाल्यास शर्मा वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी दाट शक्यता आहे. हा पेच भाजप नेते कसा सोडवितात, हे बघणे रंजक ठरेल.