अहमदाबाद - सध्या गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. दरम्यान, अहमदाबादमधील पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी हिनेही उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपाने सोनल मोदी यांना उमेदवारी नाकारली आहे. नव्या नियमांचा हवाला देऊन भाजपाकडून सोनल मोदींना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.भाजपाने अहमदाबाद पालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र यामध्ये सोनल मोदींच्या नावाचा समावेश नाही. सोनल मोदी यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, त्यांनी अहमदाबाद पालिकेच्या बोदकदेव प्रभागातून उमेदवारी मागीतली आहे. सोनल मोदी ह्या मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांची बहीण आहे. प्रल्हाद मोदी हे अहमदाबादमध्ये रेशन दुकान चालवतात. तसेच ते गुजरात रास्त दर दुकान संघाचे अध्यक्षही आहे.दरम्यान, भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आर. पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्षाचे नियम हे सर्वांसाठी सारखे आहेत. पक्षाच्या नेत्यांच्या नातेवाईकांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार नसल्याची गुजरात भाजपाने हल्लीच घोषणा केली होती.दुसरीकडे सोनल मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर भाजपाची कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मागितली होती. गुजरातमधील राजकोट, अहमदाबाद, बडोदा, सूरत, भावनगर आणि जामनगरसह एकूण सहा पालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर ८१ नगरपालिका आणि ३१ जिल्हा परिषदा आणि २३१ पंचायत समित्यांसाठी २८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
अहमदाबाद पालिका निवडणूक : पंतप्रधान मोदींच्या पुतणीला भाजपाने उमेदवारी नाकारली
By बाळकृष्ण परब | Updated: February 5, 2021 08:01 IST