भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान
By Admin | Updated: September 15, 2014 03:48 IST2014-09-15T03:48:22+5:302014-09-15T03:48:22+5:30
मदरशांमध्ये दहशतवादाचे शिक्षण दिले जाते,’ असा आरोप करून भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एका नव्या वादाला जन्म दिला आहे

भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान
लखनौ : ‘मदरशांमध्ये दहशतवादाचे शिक्षण दिले जाते,’ असा आरोप करून भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एका नव्या वादाला जन्म दिला आहे. साक्षी महाराजांच्या या विधानावर अन्य राजकीय पक्षांनी जोरदार टीका केली. भाजपा खोट्या गोष्टींचा प्रचार करून सांप्रदायिक ध्रुवीकरण निर्माण करीत असल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे.
‘मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जात आहे. ते (मदरसे) त्यांना दहशतवादी आणि जिहादी बनवीत आहेत. हे काही राष्ट्राच्या हिताचे नाही,’ असे उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज म्हणाले. कनौज जिल्ह्याच्या नादेमऊ येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना धार्मिक शाळांमधून राष्ट्रवादाचे शिक्षण दिले जात नाही. असा एक मदरसा मला दाखवा की जेथे १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंगा फडकविला जातो. राष्ट्रवादाशी काही देणेघेणे नसणाऱ्या मदरशांना सरकारी मदत दिली जात आहे. आमच्या बहुतांश शाळांना मात्र कोणतीही मदत मिळत नाही. पण या मदरशांना मात्र मदत मिळते.’
समाजवादी पार्टीने साक्षी महाराजांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली. हे वक्तव्य द्वेषपूर्ण आणि समाजात फूट पाडणारे आहे, असे सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले. तर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा आणि देशाला दुसरा पाकिस्तान बनविण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला. साक्षी महाराजांनी मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जाते याचे पुरावे दिले पाहिजे. रा. स्व. संघ आणि परिवारातर्फे अशाच खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)