भाजप खासदाराने भडकवली सहारनपूर दंगल - चौकशी आयोग
By Admin | Updated: August 17, 2014 13:27 IST2014-08-17T13:21:49+5:302014-08-17T13:27:13+5:30
उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथे दोन अल्पसंख्यांक समुदायामध्ये झालेली दंगल भडकवण्यामागे भाजप खासदाराचा हात होता असा आरोप दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने केला आहे.

भाजप खासदाराने भडकवली सहारनपूर दंगल - चौकशी आयोग
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १७ - उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील दंगल भडकवण्यामागे भाजप खासदाराचा हात होता असा आरोप दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने केला आहे. स्थानिक प्रशासन यंत्रणा दंगलीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही या आयोगाने ठेवला आहे.
गेल्या महिन्यात जमिनीच्या वादातून सहारनपूर येथील दोन समुदायांमध्ये दंगल झाली होती. या दंगलीत तिघांचा मृत्यू झाला होता तर सुमारे २० जण जखमी झाले होते. या दंगलीच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पाच सदस्यीय चौकशी आयोग नेमले होते. यात ग्रामविकास मंत्री अरविंद सिंह गोप, शिक्षणमंत्री शिवाकांत ओझा, युवा कल्याण परिषदेचे उपाध्यक्ष आशू मलिक आणि मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी इकराम कुरैशी यांचा समावेश होता. या आयोगाने १५ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सोपवला आहे. या अहवालात आयोगाने भाजप खासदारावर दंगल भडकवल्याचा आरोप केल्याने गदारोळ निर्माण झाला आहे. या अहवालाविषयी माहिती देताना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव नरेश अग्रवाल म्हणाले, ही दंगल जिल्ह्यातील प्रशासकीय अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे घडली. दंगलीच्या आदल्या रात्री प्रशासनाने वादग्रस्त जमिनीवर बांधकामाची परवानगी दिली. प्रत्यक्षात प्रशासकीय अधिका-यांनी ही परवानगी द्यायला नको होती. तसेच वादग्रस्त ठिकाणी लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवणे अपेक्षीत होते. मात्र प्रशासन यातही अपयशी ठरले असे अग्रवाल यांनी सांगितले.
भाजपचे खासदार राघव लखनपाल यांनी दंगल भडकवल्याचे आयोगाने अहवालात म्हटले आहे.लखनपाल दंगलग्रस्त भागातील गल्लीबोळ्यात फिरुन दंगल करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देत होते असा गंभीर आरोप अहवालात करण्यात आला आहे. या आयोगाने सहारनपूरमधील लोकांशी आणि प्रशासकीय अधिका-यांची भेट घेऊन हा अहवाल तयार केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. खासदार राघव लखनपाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
--------------
पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी
भाजप दुधाने धुतलेला पक्ष नाही. पंतप्रधान मोदींनी लालकिल्ल्यावरील भाषणात १० वर्षांसाठी जातीय हिंसाचार थांबवा असे आवाहन केले. मात्र स्वतःच्या पक्षातील जातीयवादी शक्तींना ते रोखू शकले नाही. पंतप्रधानांची ही दुटप्पी भूमिका असून यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे - नरेश अग्रवाल, समाजवादी पक्षाचे नेते
--------------
भाजपला गोवले जात आहे
सहारनपूर दंगलीच्या अहवालात भाजप खासदाराला गोवले जात आहे. उत्तरप्रदेशमधील पोटनिवडणुकीच्या तोंडावर धर्माच्या आधारे मताचे विभाजन करण्यासाठी सत्ताधा-यांनी अहवालात भाजप खासदाराचे नाव गोवले आहे. अहवालात प्रशासकीय यंत्रणांचे अपयश म्हटले आहे. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार असून यामुळे तेदेखील प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते - भाजप
--------------
अहवाल धूळफेक करणारा
उत्तरप्रदेश सरकारने सहारनपूर दंगलीप्रकरणी दिलेला अहवाल हा डोळ्यात धूळफेक करणारा अहवाल आहे. भाजप आणि समाजवादी पक्ष हे दोन्ही पक्ष दंगलीसाठी जबाबदार आहेत - मायावती, बसपा अध्यक्ष