संसदेत अमित शाह यांनी केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून आधीच वातावरण तापलेले असताना भाजपा खासदार प्रताप सारंगी हे खाली पडल्याने जखमी झाले आहेत. राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप सारंगी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
सारंगी यांच्या दाव्यानुसार ते एका ठिकाणी उभे होते. तेव्हा राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का दिला, तो खासदार माझ्यावर कोसळला. यामुळे मी खाली पडलो व माझ्या डोक्याला दुखापत झाली.
प्रताप सारंगी यांच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी संसदेत जात होतो. संसदेत जाण्याचा माझा अधिकार आहे. मला संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपाचे खासदार धक्काबुक्की करत होते. धक्काबुक्कीने काही होत नाही, असा उलट आरोप केला आहे.
अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी, इंडिया आघाडीचे आंदोलनअमित शाह यांनी आंबेडकरांबद्दल वक्तव्य केल्याने विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. यामुळे काँग्रेस व विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. विरोधक निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आले आहेत. आंबेडकर प्रतिमेपासून मकर दरवाज्यापर्यंत जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अशातच भाजपाचे नेते आम्हाला धमक्या देत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.