आग्र्याचं नाव बदलून 'अग्रवन' ठेवा, भाजपा आमदाराची योगी आदित्यनाथांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 21:16 IST2018-11-10T21:16:29+5:302018-11-10T21:16:41+5:30
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारनं अलाहाबादचं नाव प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्रा शहराचं नावही बदलण्याची मागणी भाजपा आमदारानं केली आहे.

आग्र्याचं नाव बदलून 'अग्रवन' ठेवा, भाजपा आमदाराची योगी आदित्यनाथांकडे मागणी
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमधील योगी सरकारनं अलाहाबादचं नाव प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्रा शहराचं नावही बदलण्याची मागणी भाजपा आमदारानं केली आहे. भाजपाचे आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी आग्र्याचं नवा अग्रवन करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी भाजपा आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रही लिहिलं आहे.
गर्ग यांच्या मते, आग्र्यात मोठं वन(जंगल) आणि अग्रवाल(महाराजा अग्रसेन यांचे अनुयायी) आहेत. त्यामुळे त्याचं नाव बदलून अग्रवन ठेवण्यात आलं पाहिजे, अशी मागणी गर्ग यांनी केली. पूर्वी आग्रा हे शहर अग्रवन म्हणून ओळखलं जायचं. परंतु कालौघात त्याचं नाव पहिल्यांदा अकबराबाद आणि त्यानंतर आग्रा करण्यात आलं. त्यामुळे या नावांना काहीही अर्थ नसून आग्र्याचं नाव पूर्वीप्रमाणेच अग्रवन करावे, असं गर्ग यांनी सांगितलं आहे. तसेच आग्र्याचं नाव अग्रवन करण्यासाठी लवकरच योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचं गर्ग म्हणाले आहेत. 'अग्रसेन महाराजांचा अनुयायी असलेला वैश्य समाज मोठ्या प्रमाणात आग्र्यात आहे. त्यांची संख्या 10 लाखांच्या आसपास आहे. शहरात अग्रवाल समाजाचे लोकही मोठ्या संख्येनं आहेत,' असंही गर्ग म्हणाले आहेत.