कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ मीनाक्षी लेखी या घोड्यावरून पडल्याने जखमी झाल्या आहेत. त्यामुळे यात्रा अर्ध्यावर सोडून त्या माघारी परतल्या आहेत. कैलाश मानसरोवर यात्रेसाठी लिपुलेख खिंडीतून गेलेल्या यात्रेकरूंच्या ताफ्यामध्ये मीनाक्षी लेखी यांचा समावेश होता. त्यांना तिबेटमध्ये कैलाश पर्वताची प्रदक्षिणा मार्गातील प्राथमिक ठिकाण असलेल्या दार्चिनी येथे झालेल्या अपघातात दुखापत झाली. त्या घोड्यावरून पडून जखमी झाल्या.
तिबेटमध्ये घोड्यावरून पडून जखमी झालेल्या मीनाक्षी लेखी यांना कैलाश मानसरोवर यात्रेच्या वाटेतून भारताच्या हद्दीत असलेल्या गुंजी येथील तळावर आणण्यात आलं आहे. येथून त्यांना सोमवारी हेलिकॉप्टरच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात येणार आहे. मीनाक्षी लेखी ह्या दार्चिनी येथे घोड्यावरून पडून जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना यात्रा अर्धवट सोडून गुंजी येथे यावं लागलं, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पिथौरागडचे जिल्हा माहिती अधिकारी संतोष चंद यांनी सांगितले की, दार्चिन येथे जखमी झालेल्या लेखी यांना चिनी अधिकाऱ्यांनी लिपुलेखपर्यंत आणून सोडले. तिथून त्यांना आयटीबीपीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गुंजी येथील तळापर्यंत आणले. दार्चिन येथून कैलाश मानसरोवराच्या प्रदक्षिणा मार्गाची सुरुवात होते. आता मीनाक्षी लेखी यांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात दाखल करण्यासाठी हवामान सुधारण्याची वाट पाहिली जात आहे. सोमवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाठवलं जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.