शीलेश शर्मा नवी दिल्ली : कर्नाटकातील निवडणुकीच्या तारखा मंगळवारी निवडणूक आयोगाने जाहीर करण्याआधी भाजपाच्या आयटी शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी टिष्ट्वटरवरून त्या घोषित केल्याने भाजपा सुपर इलेक्शन कमिशन झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केली. भाजपा घटनात्मक संस्थांचा डेटाही चोरू लागले की काय? असा सवालही सुरजेवाला यांनी केला. यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुरजेवाला म्हणाले की, सत्तारूढ पक्ष व अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध निवडणूक आयोग काही कारवाई करणार आहे काय? त्या पक्षाने निवडणूक आयोगापूर्वीच तारखांची घोषणा केली आहे. भाजपाच्या आयटी प्रमुखांविरुद्ध गोपनीय माहिती लिक केल्या प्रकरणी आयोग गुन्हा दाखल करणार काय?अमित मालवीय यांनी कर्नाटकमध्ये मतदान १२ मे रोजी, तर मतमोजणी १८ मे रोजी होणार असल्याचे आधीच टिष्ट्वट केले. त्यापैकी १२ मे रोजीच मतदान होणार आहे, पण टिष्ट्वटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि भाजपा बॅकफूटवर गेली. अर्थात, आम्ही केवळ अंदाज व्यक्त केला, अशी सारवासारव भाजपाने केली.आयोगाने घेतली गंभीर दखलमुख्य निवडणूक आयुक्त रावत म्हणाले की, निवडणूक तारखा लिक होणे ही गंभीर बाब आहे. आयोग याची चौकशी करेल आणि कठोर पावले उचलेल. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शिष्टमंडळासह मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन पक्षानर्फे खुलासा केला. आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये, यासाठी आयोग भाजपाला नोटीस देण्याच्या विचारात आहे.
भाजपाने आधीच जाहीर केली निवडणुकीची तारीख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:38 IST