राज्यसभेत भाजपाचे ६९, तर काँग्रेसचे ५० सदस्य; रालोआला बहुमत मात्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:58 IST2018-03-24T23:58:23+5:302018-03-24T23:58:23+5:30
राज्यसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येताच भाजपच्या सदस्य संख्येत ११ ने वाढ तर काँग्रेसच्या ४ जागा कमी झाल्या आहेत. भाजपची स्थिती निकटच्या प्रतिस्पर्धी पक्षापेक्षा मजबूत झाली आहे. परंतु भाजपाप्रणित रालोआ अद्यापही राज्यसभेत बहुमतापासून दूर आहे.

राज्यसभेत भाजपाचे ६९, तर काँग्रेसचे ५० सदस्य; रालोआला बहुमत मात्र नाही
नवी दिल्ली : राज्यसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येताच भाजपच्या सदस्य संख्येत ११ ने वाढ तर काँग्रेसच्या ४ जागा कमी झाल्या आहेत. भाजपची स्थिती निकटच्या प्रतिस्पर्धी पक्षापेक्षा मजबूत झाली आहे. परंतु भाजपाप्रणित रालोआ अद्यापही राज्यसभेत बहुमतापासून दूर आहे.
शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, २८ उमेदवार जिंकल्याने भाजपाला ११ जागांचा फायदा झाला आहे. काँग्रेसने १० जागांवर विजय मिळविला आहे. यापूर्वी १४ जागा काँग्रेसच्या ताब्यात होत्या. काँग्रेसला ४ जागांचे नुकसान झाले आहे. एकूण २४५ सदस्य असलेल्या सभागृहात आता भाजपच्या सदस्यांची संख्या ५८ वरुन ६९, तर काँग्रेसच्या जागा आता ५४ वरुन ५० होणार आहेत. नव्या सदस्यांचा शपथविधी पुढील आठवड्यात होईल.
सरकारसमोर अडचणी
सरकार आता सभागृहात पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. अण्णाद्रमुक, टीआरएस, वायएसआर काँग्रेस आणि बिजद यासारख्या रालोआच्या बाहेरील प्रादेशिक पक्षांचे आपणास समर्थन मिळू शकेल, असे भाजपाला वाटत आहे. सरकारी विधेयके लोकसभेत मंजूर होऊनही बहुमताअभावी राज्यसभेत रखडतात. राज्यसभेत विरोधकांची एकजूट होत असल्याने मोदी सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे.