‘पप्पू’ शब्द वापरायला मनाई, भाजपाला निवडणूक आयोगाचे निर्देश; मानहानी करणे अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 04:41 IST2017-11-15T22:25:12+5:302017-11-16T04:41:28+5:30
भारतीय जनता पक्षाला निवडणूक आयोगाने गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये ‘पप्पू’ शब्द वापरायला मनाई केली आहे

‘पप्पू’ शब्द वापरायला मनाई, भाजपाला निवडणूक आयोगाचे निर्देश; मानहानी करणे अयोग्य
अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाला निवडणूक आयोगाने गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये ‘पप्पू’ शब्द वापरायला मनाई केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी पप्पू शब्द वापरला जातो व तो मानहानीकारक आहे. समाजमाध्यमांत ‘पप्पू’ हा शब्द राहुल गांधी यांना कमी लेखण्यासाठी वापरला जातो.
आयोगाकडून पप्पू शब्द वापरायला मनाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना भाजपच्या सूत्रांनी सांगितले की जाहिरातींचे लेखन हे कोणत्याही व्यक्तिशी संबंधित नव्हते. गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील प्रसारमाध्यम समितीने तिच्याकडे गेल्या महिन्यात मंजुरीसाठी सादर केलेल्या जाहिरातीतील शब्दाला आक्षेप घेतला होता, असे भाजपने म्हटले. निवडणुकीशी संबंधित कोणतीही जाहिरात करायच्या आधी आम्हाला समितीकडे प्रमाणपत्रासाठी तिचे लेखन सादर करावे लागते. तथापि, समितीने पप्पू या शब्दाला तो मानहानिकारकअसल्याचे सांगून आक्षेप घेतला. तो शब्द काढून टाकून त्याऐवजी दुसरा शब्द वापरण्यास त्यांनी आम्हाला सांगितल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. आक्षेपानुसार नवा शब्द घालून नवे लेखन निवडणूक आयोगाला सादर केले जाईल, असे ते म्हणाले.
यशवंत सिन्हांनी मोदींची
तुलना केली तुघलकाशी
भाजपचे नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोटांबदीच्या निर्णयासाठी महंमद बिन तुघलकाशी तुलना केली. सिन्हा म्हणाले की, १४ व्या शतकातील दिल्लीचा राजा तुघलकानेही ७०० वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती.
येथे कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी मोदी यांच्या वादग्रस्त ठरलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला ३.७५ लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा केला. अनेक राजे पूर्वी होऊन गेले की ज्यांनी आपले स्वत:चे चलन आणले. काही जणांनी नवे चलन आणल्यानंतरही जुनेही कायम ठेवले. परंतु ७०० वर्षांपूर्वीच्या शहेनशाहने (तुघलक) स्वत:चे चलन आणल्यानंतर जुने चलन रद्द केले होते. तुघलकाची दिल्लीतील राजवट फारच थोडा काळ होती तरी त्याने राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती, असे ते म्हणाले.