Uttar Pradesh Local Body Bypoll Election News: उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद नगरपालिका अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे अनेक मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची सक्रीय सहभाग नोंदवत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु, भाजपाच्या उमेदवाराचा सपाटून पराभव झाला. या निवडणुकीत भाजपा उमेदवार केवळ १ हजार ३५२ मते मिळून थेट पाचव्या स्थानी गेला. काँग्रेस, अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनाही भाजपा उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली.
समाजवादी पक्षाचे उमेदवार अमीर अराफत यांनी ८ हजार ९०६ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीच्या निकालानंतर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपावर खोचक टीका केली. अखिलेश यादव म्हणाले की, महमूदाबादमध्ये सपाचा पक्षाचा विजय हा मनोबल वाढवणारा आहे. भाजपा पाचव्या क्रमांकावर येणे हे उत्तर प्रदेशच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत आहे, असे सूतोवाच अखिलेश यादव यांनी केले.
भाजपात तिकीट वाटपावरून वाद आणि बंडखोरी
महमूदाबाद आणि मिश्रिख येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. महमूदाबाद येथील निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. येथे भाजपाने माजी खासदार राजेश वर्मा यांचे निकटवर्तीय संजय वर्मा यांना तिकीट दिले. परंतु, भाजपाच्या या निर्णयापासूनच वादाला तोंड फुटले. पक्ष संघटनेत बराच काळ सक्रिय असलेले अनेक चेहरे उमेदवार निवडीच्या शर्यतीत होते. परंतु, त्यांच्यापैकी कुणालाच संधी देण्यात आली नाही.
बंडखोरांनी अधिकृत उमेदवारापेक्षा मिळवली जास्त मते
तिकीट वाटपावर नाराज झालेल्यांपैकी अतुल वर्मा आणि अमरीश गुप्ता यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले. निवडणूक निकालांनंतर असे दिसून आले की, जनतेने भाजपाच्या अधिकृत उमेदवारापेक्षा या बंडखोर उमेदवारांना जास्त पाठिंबा दिला. अतुल वर्मा आणि अमरीश गुप्ता अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर भाजपाचे अधिकृत उमेदवार पाचव्या स्थानी राहिले. या निवडणूक भाजपाचे स्थानिक संघटन विभाजित दिसले. पक्षातील गटबाजीही उघड झाली. पक्षात असंतोष वाढला. या सर्वांचा निकालांवर थेट परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपा उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली.
दरम्यान, मिश्रिख येथे भाजपाने विजय मिळवला. या भागात नैमिषारण्यसारख्या प्रमुख धार्मिक स्थळाचा परिसर असल्यामुळे याचे महत्त्व अधिक असल्याचे म्हटले जात आहे. अयोध्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाला ही जागा राखणे आव्हानात्मक होते. भाजपाने स्थानिक आमदार रामकृष्ण भार्गव यांच्या सून सीमा भार्गव यांना उमेदवारी दिली. सपाने उमेदवार उतरवला होता. परंतु तो तुलनेने नवीन आणि अज्ञात चेहरा होता. अखेर सीमा भार्गव ३ हजार २०० मतांनी विजयी झाल्या.