लखनऊ : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जावर शैक्षणिक योग्यतेवरून स्मृती ईरानींनंतर आता आणखी एक भाजपाचा उमेदवार गोत्यात आला आहे. गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, 2014 मध्ये काँग्रेसकडून लढताना त्यांनी पदवी आणि 2019 मध्ये 12 वी असे शिक्षण नमूद केल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जावर टांगती तलवार आहे.
कुशीनगरच्या एका तरुणाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. रवी किशन गोरखपूर येथून भाजपाचे उमेदवार आहेत. 2014 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूरमधून उमेदवार होते. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जावर शिक्षण पदवी दाखविली होती. मात्र, 2019 मध्ये ते भाजपाच्या तिकीटावर लढत असून गोरखपूरमध्ये भरलेल्या उमेदवारी अर्जावर त्यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्याचे म्हटले आहे. आधी पदवी आणि नंतर 12वीचे शिक्षण कोणत्या विद्यापीठात घेता येते, असा प्रश्नही या तरुणाने उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणीही य़ा युवकाने केली आहे.
स्मृती ईरानींविरोधातही तक्रारयाआधी अमेठीच्या भाजपाच्या उमेदवार स्मृती इरानी यांच्याविरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झालेली आहे. 2004 मध्ये त्यांनी दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढविताना 1996 मध्ये कला शाखेची पदवी घेतल्याचे म्हटले होते. तर 2019 मध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेतले नसल्याचे म्हटले आहे.