बिहारमध्ये भाजपा, जेडीयू लढणार प्रत्येकी १७ जागा, तर पासवान यांना सहा जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:01 IST2019-03-18T05:59:55+5:302019-03-18T06:01:50+5:30
बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीत लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून कुरबुरी सुरू असताना भाजपा, जनता दल युनायटेड (जेडीयू)स लोक जनशक्ति पार्टी (एलजेपी) यांच्या युतीने जागावाटप जाहीरही केले.

बिहारमध्ये भाजपा, जेडीयू लढणार प्रत्येकी १७ जागा, तर पासवान यांना सहा जागा
- ए. पी. सिन्हा
पाटणा - बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीत लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून कुरबुरी सुरू असताना भाजपा, जनता दल युनायटेड (जेडीयू)स लोक जनशक्ति पार्टी (एलजेपी) यांच्या युतीने जागावाटप जाहीरही केले. त्यानुसार बिहारमध्ये भाजप व जेडीयू प्रत्येकी १७ तर रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी ६ जागा लढविणार आहे. गेल्या वेळी भाजपाने बिहारच्या ३0 जागा लढवल्या होत्या.
जेडीयूला कटिहार, पूर्णिया, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, काराकाट, गया, जहानाबाद, सुपौल,किशनगंज, मधेपुरा, वाल्मिकीनगर, सीतामढी, झंझारपूर या लोकसभा जागा मिळाल्या आहेत. तर भाजपाच्या वाट्याला पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य, महाराजगंज, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुजफ्फरपूर, सारण, उजियारपूर, बेगूसराय, पाटणासाहिब, पाटलीपुत्र, आरा, शिवहर, बक्सर, सासाराम, औरंगाबाद हे लोकसभा मतदारसंघ आले आहेत. तर पासवान यांच्या एलजेपीला वैशाली, समस्तीपूर, हाजीपूर, खगडिया, जमुई, नवादा या लोकसभेच्या सहा जागा देण्यात आल्या आहेत.
२००४नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकांत या तीन पक्षांच्या युतीला ४५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मोदी यांची बिहारमध्ये लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा राज्यकारभार व रामविलास पासवान यांची मजबुत साथ यांच्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांत आपलीच युती जिंकेल असा विश्वास या नेत्यांना वाटत आहे. मात्र राज्यात १३ जागा अशा आहेत की, तिथे मुस्लीम व यादव ज्याच्या बाजूने मतदान करतील तोच विजयी
होईल.
सिन्हा, गिरीराज सिंह यांचा पत्ता कट
शत्रुघ्न सिन्हा यांना यंदा भाजपा उमेदवारी देणार नाही, हे स्पष्ट आहे. ते ज्या ठिकाणहून निवडून येते होते, त्या पाटलीपुत्र मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद निवडणूक लढवतील, असे दिसत आहे. सिन्हा बहुधा राजदतर्फे निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. नवादा मतदारसंघातून भाजपाचे वादग्रस्त नेते गिरीराज सिंह निवडून आले होते. पण ती जागा यंदा लोकजनशक्ती पार्टीला मिळाली आहे.