शाजिया इल्मीही झाल्या भाजपवासी
By Admin | Updated: January 17, 2015 02:44 IST2015-01-17T02:44:44+5:302015-01-17T02:44:44+5:30
किरण बेदी यांच्यापाठोपाठ शाजिया इल्मी याही भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या यापूर्वी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील

शाजिया इल्मीही झाल्या भाजपवासी
नवी दिल्ली : किरण बेदी यांच्यापाठोपाठ शाजिया इल्मी याही भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या यापूर्वी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील महत्त्वपूर्ण सदस्य राहिल्या आहेत. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या तिकिटावर दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करला होता.
दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा नसून पक्ष माझ्या भावनेचा आदर करील, अशी आशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किरण बेदी यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून पाहिले जात आहे. भाजपाचे सदस्यत्व स्वीकारल्यानेतर शाजिया म्हणाल्या की, विधानसभा व त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्याने माझी निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा नाही. मी जनतेची सेवा करणार. पक्षाच्या आदेशाचे पालन करीन. निवडणूक न लढण्याच्या माझ्या इच्छेचा पक्ष आदर करील, असे मला वाटते, असेही त्या म्हणाल्या.
धर्मांतराशी भाजपचा संबंध नाही
बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराशी भाजपचा संबंध नाही. अशा पद्धतीने धर्मांतर घडवून आणण्याच्या बाजूने मी नाही, असे इल्मी यांनी एका उत्तरात सांगितले. दिल्ली भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय आणि दिल्लीचे प्रभारी प्रभात झा यांच्या उपस्थितीत इल्मी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी संगीतकार व गायक आनंद राज आनंद यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
निवडणूक समितीची सोमवारी बैठक
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवार १९ जानेवारी रोजी बैठक होत आहे. २१ जानेवारी हा नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. बेदींना भावी मुख्यमंत्र्याच्या रूपात समोर आणायचे की नाही याबाबत भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, कारण हरियाणा, महाराष्ट्र व झारखंडमधील निवडणुकीत मोदी यांच्याच प्रतिमेचा आधार घेण्यात आला होता. बेदींना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)