नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा आपल्या राजकीय हेतूसाठी वापर केला, असा आरोप भाजपने केला आहे. मनमोहन सिंग यांच्या मृत्यूमुळे देश शोकसागरात बुडालेला असताना राहुल गांधी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले, असाही दावा भाजपने केला.
भाजपच्या आयटीचे सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी राजकीय हेतूसाठी सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचाही वापर केला. गांधी घराणे व काँग्रेस शीखांचा द्वेष करतात, हे इतिहासातील उदाहरणांवरून सिद्ध झाले. मालवीय यांच्या आरोपांबद्दल काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी म्हटले आहे की, सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी यमुना नदी तीरावर जागा उपलब्ध करून द्या, ही मागणी केंद्राने नाकारली. राहुल गांधी हे खासगी दौऱ्यावर आहेत. त्याचा भाजपला त्रास का होतो, असा सवाल त्यांनी विचारला. '
मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे खासगीपण जपले : काँग्रेस मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे खासगीपण जपण्यासाठी काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधानांच्या अस्थिविसर्जनप्रसंगी उपस्थित नव्हते, असे त्या पक्षाने म्हटले आहे. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले, याची आठवण काँग्रेसने करून दिली.मनमोहन सिंग यांच्या मुद्द्यावरून वाद घालू नका : अभिजीत मुखर्जीमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर वादाचे अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. मात्र, अशा प्रकारे कोणीही वाद निर्माण करू नये, असे आवाहन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी सोमवारी सांगितले.