Bipin Rawat Helicopter Crash: हेलिकॉप्टरमधून बाहेर उडी मारणाऱ्यांमध्ये रावत देखील होते; शेवटपर्यंत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 21:43 IST2021-12-09T21:43:21+5:302021-12-09T21:43:46+5:30
Bipin Rawat Helicopter Crash: रावत हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असतात. हेलिकॉप्टरमध्ये देखील त्यांचे सुरक्षा रक्षक होते. लष्कराचे सात आणि हवाई दलाचे 4 अधिकारी होते.

Bipin Rawat Helicopter Crash: हेलिकॉप्टरमधून बाहेर उडी मारणाऱ्यांमध्ये रावत देखील होते; शेवटपर्यंत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न
भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांचे पार्थिव नुकतेच पालन विमानतळावर आणण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांना अंतिम दर्शन देण्यासाठी ही पार्थिव तिथे आणण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही वेळापूर्वी अंत्यदर्शन घेतले. बिपीन रावत यांना वाचविण्याचा हेलिकॉप्टर खाली कोसळेपर्यंत प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्ष दर्शीने सांगितल्यानुसार हेलिकॉप्टर क्रॅश होत असताना तिघांनी पेटत्या कपड्यांसह खाली उडी मारली.
या हेलिकॉप्टरमधून 14 जण प्रवास करत होते. यापैकी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे प्राण वाचले आहेत. त्यांना पुढच्या उपचारांसाठी बंगळुरुच्या एअर फोर्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात येत आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर 14 पैकी दोघे जण जिवंत होते. यामध्ये एक रावत देखील होते. एवढी भीषण दुर्घटना होती की मृतांची ओळख पटविणेदेखील कठीण झाले आहे. हेलिकॉप्टरमधून ज्या तिघांनी उड्या मारल्या त्यात रावत होते. याचाच अर्थ मृत्यू समोर दिसत असताना हेलिकॉप्टरमधील अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत रावत यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता.
आगीने वेढलेल्या हेलिकॉप्टरमध्ये 11 जण होते. तर काही अंतरावर तीन जण पडले होते. तिघेही जळालेल्या अवस्थेत होते. एकाने पाणी मागितले. हळू हळू स्थानिक लोकांची जागा पोलीस आणि लष्कराने घेतली. 2.5 तासांनी आग विझविण्यात आली. घटनास्थळावर अॅम्बुलन्स आणणे कठीण होते. यामुळे स्थानिकांकडून चादरी घेण्यात आल्या आणि सर्वांना वेलिंग्टनच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
रावत हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असतात. हेलिकॉप्टरमध्ये देखील त्यांचे सुरक्षा रक्षक होते. लष्कराचे सात आणि हवाई दलाचे 4 अधिकारी होते. या अधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी जेव्हा जमीन दिसू लागली तेव्हा बिपीन रावत यांना घेऊन पेटत्या अंगाने खाली उडी मारली. अखेर केवळ तीन लोकच हेलिकॉप्टरपासून वेगळे का साप़डले? त्यात रावत देखील कसे होते? रावत यांना शेवटच्या क्षणी हेलिकॉप्टरपासून वेगळे करण्याचा प्रयत्न झाला का? याचे उत्तर आता चौकशीत मिळण्याची शक्यता आहे.