coronavirus : ...अन् बिल गेट्स यांनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणाले, असं काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 21:10 IST2020-04-22T21:09:03+5:302020-04-22T21:10:12+5:30
कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.

coronavirus : ...अन् बिल गेट्स यांनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणाले, असं काही
नवी दिल्लीः जगभरात कोरोनाचा फैलाव झाला असून, अनेक देश त्याला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. भारतातही मोदी सरकारच्या प्रसंगावधानामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला नाही. विशेष म्हणजे कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्यानं त्यांचं कौतुक होत आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी मोदींना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून त्यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
भारताने योग्य वेळी निर्णय घेतला
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात गेट्स म्हणाले, कोरोनाविरुद्धच्या युद्धात तुम्ही आणि तुमच्या सरकारने वेळेत ज्या प्रकारे महत्त्वाची पावलं उचलली आहेत ती कौतुकास्पद आहेत. कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर भारतानं लागलीच लॉकडाऊन जाहीर केले. याव्यतिरिक्त हॉटस्पॉट साइट्सही ओळखल्या गेल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कोट्यवधी लोकांना प्रशासनाच्या मदतीने होम क्वारंटाइन करण्यात आलं.
भारताची आरोग्य व्यवस्था होतेय मजबूत
या सर्वांव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे अधिकाधिक चाचण्या घेण्यावर लक्ष केंद्रित केले. आवश्यकतेनुसार संपूर्ण परिसर सील करण्यात आला. तसेच आरोग्य व्यवस्था भारत सातत्यानं मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडून सर्व आवश्यक उपाययोजना वेळेवर केल्या जात आहेत.
Bill Gates writes to Prime Minister Narendra Modi: We commend your leadership and the proactive measures you and your government have taken to flatten the curve of the COVID-19 infection rate in India, such as adopting a national lockdown... pic.twitter.com/zDUiNTnE8M
— ANI (@ANI) April 22, 2020
भारत डिजिटल ताकदीचा करतो योग्य वापर
कोरोनाच्या युद्धात भारताने आपल्या डिजिटल शक्तीचा पुरेपूर उपयोग केला आहे आणि मला त्याचा अधिक आनंद झाला आहे, असे गेट्स यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. आरोग्य सेतू मोबाइल अॅप सरकारने सुरू केले असून, आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. या अॅपच्या मदतीने आपण कोरोनाग्रस्त असलेला परिसर किती सुरक्षित आहे हे सहज शोधू शकतो.
Bill Gates writes to PM Modi: Grateful to see that you’re seeking to balance public health imperatives with the need to ensure adequate social protection for all Indians. https://t.co/DHYub3OriB
— ANI (@ANI) April 22, 2020
सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा एकत्र
सर्व भारतीयांना पुरेशी सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याबरोबरच तुम्ही एकत्र सार्वजनिक आरोग्य संतुलन राखत आहात. आपल्या नेतृत्वात अशा छान गोष्टी होत असल्याचं पाहून आनंद झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.