पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच या पहलगाममधील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. अशा परिस्थितीत याआधी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षावेळी घडलेल्या थरारक प्रसंगांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. असाच एक प्रसंग आहे ज्यात पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात सहभागी झालेली व्यक्ती पुढे राजकारणात जाऊन एका राज्याची मुख्यमंत्रीही झाली. या व्यक्तीचं नाव आहे बिजू पटनाईक.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानने काश्मीरवरील ताब्यासाठी भारताविरोधात युद्ध पुकारले होते. तसेच पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या फौजांना काश्मीरमध्ये घुसवले होते. त्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराला तातडीने श्रीनगर येथे पोहोचणे आवश्यक होते. त्यावेळी भारतीय जवानांना काश्मीरमध्ये उतरवण्याची जबाबदारी बिजू पटनाईक यांच्यावर सोपवण्यात आली होती. पेशाने पायलट असलेल्या आणि नंतर स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झालेल्या पटनाईक यांनी अत्यंत हिमतीने ही जोखमीची मोहीम पार पाडली होती. पुढे बिजू पटनाईक हे राजकारणात उतरले. तसेच मजल दरमजल करत केंद्रीय मंत्री आणि ओडिशा या राज्याचे मुख्यमंत्री बनले.
दरम्यान, बिजू पटनाईक यांची प्रेमकहाणीसुद्धा तितकीच थरारक आहे. ते आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीहून लाहोरला विमानाने जायचे. तसेच लग्नावेळीही त्यांनी चक्क विमानांचा ताफाच लाहोरला नेला होता. एवढंच नाही त्यापैकी एका विमानाचं सारथ्य ते स्वत: करत होते. एवढंच नाही तर एकता इंडोनेशियामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना बिजू पटनाईक यांनी पत्नीला सोबत घेत विमानाने थेट इंडोनेशियापर्यंत मजल मारली होती. तसेच तिथून एका नेत्याची सुखरूपपणे सुटका केली होती. हा नेता पुढे जाऊन इंडोनेशियाचा पंतप्रधान बनला होता.