बिहारमध्ये दारूबंदीचे पुन्हा नव्याने धोरण!
By Admin | Updated: October 3, 2016 04:13 IST2016-10-03T04:13:08+5:302016-10-03T04:13:08+5:30
उच्च न्यायालयाने दारूबंदी धोरण रद्द केल्याच्या दोन दिवसानंतरच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नवे दारुबंदी धोरण जाहीर केले.

बिहारमध्ये दारूबंदीचे पुन्हा नव्याने धोरण!
पाटणा : उच्च न्यायालयाने दारूबंदी धोरण रद्द केल्याच्या दोन दिवसानंतरच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नवे दारुबंदी धोरण जाहीर केले. यातील नियम व अटी अधिक कठोर आहेत.
नव्या दारुबंदी धोरणात कारावासाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तर, दंडाची रक्कमही अधिक असेल. एखाद्या घरात दारुची बाटली आढळल्यास त्या घरातील वयस्कर व्यक्तींना अटक करण्यात येईल, दारुबंदीचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या भागात सामुदायिक दंड लावण्यात येईल. नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैैठकीत संकल्प करण्यात आला की, दारुबंदीबाबत आमचा निश्चय कायम आहे. सामाजिक परिवर्तनासाठी आम्ही काम करत राहू. मंत्रिमंडळाच्या या बैठकींनतर उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद आणि अन्य मंत्री व मुख्य सचिव अंजनी कुमार सिंह यांच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, गांधी जयंतीच्या दिवशी हे नवे धोरण लागू झाले आहे. दरम्यान, गत ४ आॅगस्ट रोजी बिहार विधिमंडळाने दारुबंदीच्या या धोरणाला मंजुरी दिली होती. नव्या धोरणानुसार पोलिस अधिकाऱ्यांकडून एखाद्या व्यक्तीला जर या प्रकरणी त्रस्त केले जात असेल तर त्यांच्याविरुद्धही खटला चालविला जाईल. दारुबंदीचे समर्थन करताना नितीशकुमार यांनी उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा उल्लेख केला. (वृत्तसंस्था)