Bengaluru Crime: देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कायद्याचा धाक विसरून गुन्हेगार अत्याचाराच्या घटना करत आहेत. अशातच बंगळुरुमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरुमध्ये रेल्वे स्थानकाजवळ बिहारमधील तरुणीवर तिच्या भावासमोरच अत्याचार करण्यात आल्याचा भयानक प्रकार घडला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी तरुणीच्या भावाला पकडून मारहाण केल्याचेही समोर आले आहे.
बंगळुरूमध्ये बिहारमधील एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री दीड वाजता केआरपुरम रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. १९ वर्षीय पीडित तरुणी बिहारमधील बांका जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी केरळहून बंगळुरूला आली होती. तिचा भाऊ तिला घ्यायला आला होता. दोघेही जेवण करण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या बाहेर आले, त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी कर्नाटकचे रहिवासी असून ते ऑटोचालक आहेत.
दोघेही भाऊ बहीण मजूरीचे काम करत होते. मात्र काम पसंत नसल्यामुळे तरुणीला बिहारमधील बांका येथे परत जायचे होते. १ एप्रिल रोजी तिने केरळमधील एर्नाकुलम येथून ट्रेन पकडली. तिथून तिने बंगळुरू येथे राहणाऱ्या भावाला फोन केला. त्याने तिला केआरपुरम स्टेशनवर उतरण्यास सांगितले. "२ एप्रिल रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मी तिथे पोहोचलो. माझा भाऊ मला घ्यायला आला. भाऊ आणि मी जेवायला महादेवपुरा येथे जात होते. अचानक दोन लोक तिथे आले. एकाने मला खाली पाडलं आणि दुसऱ्याने माझ्या भावाला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मला एका निर्जन ठिकाणी नेले आणि माझ्यावर बलात्कार केला," असं तरुणीने एफआयआरमध्ये म्हटलं.
त्यादरम्यान, पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका आरोपीला जमावाने पकडले. लोकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, दरम्यान दुसरा आरोपी पळून गेला. मात्र काही वेळातच पोलिसांनी त्यालाही अटक केली.
"२ एप्रिल रोजी एक तरुणी आणि तिचा भाऊ बंगळुरूच्या आऊटर रिंग रोडवरील महादेवपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. त्यानंतर दोन रिक्षाचालकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि महिलेवर बलात्कार केला. आसिफ आणि सय्यद मुसहर अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही कर्नाटकातील कौलार येथील रहिवासी आहेत. आसिफने मुलीवर बलात्कार केला, तर सय्यदने तिच्या भावाला मारहाण केली. घटनेनंतर अवघ्या १५ मिनिटांत दोन्ही आरोपींना पकडण्यात आले," असं पोलीस उपायुक्त शिवकुमार म्हणाले.