सोबत जीव देऊ! प्रेमी युगुलानं शपथ घेतली; प्रियकर विष प्यायला; प्रेयसीनं ऐनवेळी 'गेम' केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:22 IST2022-03-30T13:18:20+5:302022-03-30T13:22:01+5:30
प्रेयसीनं शेवटच्या क्षणी शब्द फिरवल्यानं प्रियकराला धक्का; विश्वासघात झाल्यानं हादरला

सोबत जीव देऊ! प्रेमी युगुलानं शपथ घेतली; प्रियकर विष प्यायला; प्रेयसीनं ऐनवेळी 'गेम' केला
पाटणा: बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. कुटुंबीयांचा नात्यास विरोध असल्यानं एका प्रेमी युगुलानं सोबत मरण्याचा निश्चय केला. तशी शपथही दोघांनी घेतली. यानंतर प्रियकर विष प्यायला. मात्र प्रेयसीची विष पिण्याची हिंमत झाली नाही. गंभीर अवस्थेत तडफडत असलेल्या प्रियकराला सोडून प्रेयसी फरार झाली.
लखीसराय जिल्ह्यातल्या अभयपूरमधील राजवाटी गावातील लोकांना एक तरुण गंभीर अवस्थेत सापडला. त्याच्या तोंडातून फेस निघत होता. हा तरुण मुंगेर जिल्ह्यातल्या मुस्तफाचक गावचा असल्याचं चौकशीतून समोर आलं. त्याचं नाव सोनू कुमार आहे. सोनूच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. कुटुंबीय तातडीनं घटनास्थळी पोहोचले. सध्या मुंगेरमधल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गालिमपूरमधील एका विवाहित महिलेशी वर्षभरापासून प्रेमसंबंध असल्याचं सोनू कुमारनं सांगितलं. महिलेच्या पतीला या संबंधांबद्दल कळताच विवाहिता लखीसराय येथील अभयपूरमधील तिच्या माहेरी निघून गेली. काही दिवसांपूर्वी तिनं सोनूला मुंगेरला बोलावलं. सोनू लुधियानामध्ये नोकरी करतो. प्रेयसीनं बोलावल्यानं सोनू तिच्या भेटीसाठी अभयपूरला गेला.
सोनूच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांना तिला सोनूसोबत जाऊ दिलं नाही. घरातून होत असलेला विरोध पाहून दोघांनी सोबत मरण्याचा निश्चय केला. विष घेऊन दोघे गावाबाहेर गेले. सोनू आधी विष प्यायला. त्यानंतर त्याची प्रेयसी विष पिणार होती. मात्र तिनं ऐनवेळी तिथून पळ काढला. प्रेयसीनं विश्वासघात केल्यानं सोनूला धक्का बसला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.