बिहारमध्ये मोदी लाट ओसरली, लालू नितीशचे पारडे जड
By Admin | Updated: August 25, 2014 17:34 IST2014-08-25T17:29:59+5:302014-08-25T17:34:06+5:30
बिहारमध्ये १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे चित्र दिसले.

बिहारमध्ये मोदी लाट ओसरली, लालू नितीशचे पारडे जड
ऑनलाइन टीम
पटणा, दि. २५ - बिहारमध्ये १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे चित्र दिसले. तर कट्टर विरोधक असताना मैत्रीचा हात पुढे करीत पहिल्यांदाच युती करून निवडणुकीला सामोरे गेलेले लालू प्रसाद यादव व नितीश कुमार यांचे पारडे जड झाले आहे.
नुकत्याच १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी, नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि काँग्रेस युतीला ६ जागा मिळाल्या तर भाजपाला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोदी लाटेचा खूप मोठा फायदा झाला होता. परंतू बिहारमधील पोटनिवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे दिसले. बिहारमधील प्रतिष्ठीत छप्रा मतदारसंघाची जागा राखण्यात लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला यश आले तर हाजीपूरच्या जागेवर भाजपाला यश मिळाले आहे. भागलपूरच्या एकमेव जागेवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. बिहारमधील पोटनिवडणुकीच्या निकालांवर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रीया जेडीयूचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे.