bihar : kanhaiya Kumar attacks on giriraj singh | इतरांना पाकिस्तानला पाठवणारे बेगुसरायचे नाव ऐकताच दु:खी झाले, कन्हैया कुमारचा गिरिराज सिंहाना टोला
इतरांना पाकिस्तानला पाठवणारे बेगुसरायचे नाव ऐकताच दु:खी झाले, कन्हैया कुमारचा गिरिराज सिंहाना टोला

पाटणा - सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे नवादाऐवजी बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात आल्याने पक्षनेतृत्वावर नाराज झाले आहे. मात्र बेगुसराय येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या गिरिराज सिंह यांना प्रतिस्पर्धी उमेदवार कन्हैया कुमार यांनी टोला लगावला आहे. इतरांची जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवणी करणारे पाकिस्तान टूर अँड ट्रॅव्हल्स विभागाचे व्हिसामंत्री नवादा येथून बेगुसरायला जावे लागल्याने दुखावले गेले आहेत,'' अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली आहे. 

वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे गिरिराज सिंह हे सध्या नवादा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टी यांच्यात झालेल्या जागावाटपामध्ये ही जागा भाजपाच्या मित्रपक्षांकडे गेली होती. दरम्यान, नवादा येथील तिकीट कापून बेगुसराय येथे रवानगी करण्यात आल्याने गिरिराज सिंह हे नाराज होते. तिथे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्याशी थेट आमना-सामना होणार असल्याने गिरिराज सिंह हे लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा सुरू झाली. 

दरम्यान, बेगुसराय येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या गिरिराज सिंह यांना कन्हैया कुमारने टोला लगावला आहे. इतरांना पाकिस्तानात पाठवणारे पाकिस्तान टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे व्हीसा मंत्री नवादा येथून बेगुसराय येथे रवानगी झाल्याने दुखावले आहेत. बेगुसराय वणक्कम, असे मंत्रीजींनी आताच सांगून टाकले आहे.  

 मात्र नवादाऐवजी बेगुसराय येथून तिकीट दिल्याने गिरिराज सिंह यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये अन्य कुठल्याही खासदाराचा मतदारसंघ बदलण्यात आलेला नाही. मात्र मला न विचारताच माझा मतदारसंघ बदलला गेला. त्यामुळे माझा आत्मसन्मान दुखावला गेला आहे, असे गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे. 
 


Web Title: bihar : kanhaiya Kumar attacks on giriraj singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.