बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:46 IST2025-11-12T18:45:54+5:302025-11-12T18:46:48+5:30
Bihar Election Axis My India Exit Poll : ॲक्सिसच्या एक्झिट पोलमध्ये राज्यातील मतदारांच्या पसंतीतील तीव्र जातीय ध्रुवीकरण समोर आले आहे.

बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर लगेचच जवळपास आठ कंपन्यांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला होता. परंतू ॲक्सिस माय इंडियाने दुसऱ्या दिवशी सायंकाळी आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. यामध्ये जाती-पाती, समाज आणि महिला, पुरुष व तरुणाईचा कोणाकडे कौल झुकला आहे, ते देखील देण्यात आले आहे.
ॲक्सिसच्या एक्झिट पोलमध्ये राज्यातील मतदारांच्या पसंतीतील तीव्र जातीय ध्रुवीकरण समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओबीसी आणि अत्यंत मागासवर्गीय मतदारांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर महाआघाडीवर ४३% मतांसह अल्पशी आघाडी घेतली आहे, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ४१% मते मिळण्याचा अंदाज आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला ४ टक्के तर इतरांना मिळून १२ टक्के मते पडणार असल्याचा अंदाज आहे. २४३ विधानसभा जागांचा समावेश असलेल्या २,१५४ गावे आणि शहरांमधील ४२,०३१ जणांचे मत यामध्ये नोंदविण्यात आले आहे. या सर्व्हेनुसार सर्वच जागांवर कट-टू कट फाईट पहायला मिळणार आहे.
NDA ची ताकद
ओबीसी मतदारांपैकी ६३% आणि ईबीसी मतदारांपैकी ५८% लोकांनी NDA ला मतदान केले आहे. तसेच, अनुसूचित जाती मधील ४९% आणि उच्च जातींमधील ६५% मतदारांनी NDA च्या बाजूने कौल दिला आहे.
महाआघाडीचा आधार
राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस-प्रणित महाआघाडी अजूनही त्यांच्या पारंपारिक 'मुस्लिम-यादव' मतपेढीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. महाआघाडीने तब्बल ९०% यादव मते आणि ७९% मुस्लिम मते राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, ओबीसी आणि ईबीसी वर्गात त्यांचे समर्थन अनुक्रमे १९% आणि २६% पर्यंत मर्यादित राहिले.
महिला आणि तरुणांचा कौल
मुख्यमंत्र्यांच्या कल्याणकारी योजनांमुळे महिला मतदारांचा मोठा गट पुन्हा एकदा NDA कडे (४५%) झुकला आहे. दुसरीकडे, बेरोजगारी आणि नोकरीच्या मुद्द्यांवर विद्यार्थी आणि बेरोजगार मतदारांनी महाआघाडीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. ४९% बेरोजगार आणि ४८% विद्यार्थी मतदारांनी महाआघाडीला पसंती दर्शवली आहे, ज्यामुळे रोजगाराचा मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे दिसून येते.
बहुमताचा अंदाज NDA कडे: ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, २४३ जागांच्या बिहार विधानसभेत NDA ला १२१ ते १४१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे ते बहुमताचा १२२ चा जादुई आकडा सहज पार करून सत्तेत परतण्याची शक्यता आहे. तर, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन ९८ ते ११८ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहील.